Chandrapur News: खेळता खेळता ६ वर्षांच्या चिमुकल्याने गिळला लोहचुंबक

Bhairav Diwase
चिमुरड्याच्या पोटातून शस्त्रक्रियेशिवाय काढला लोहचुंबक; डॉ. राहुल सैनानींची कमाल

चंद्रपूर:- लहान मुलं घरात खेळत असताना आपण किती लक्ष देतो? चंद्रपुरातून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, जी वाचून किंवा ऐकून कोणत्याही पालकाचा थरकाप उडेल. एका सहा वर्षांच्या मुलाने खेळता खेळता थेट लोहचुंबक गिळला. पण सुदैवाने, डॉक्टरांच्या प्रसंगावधानामुळे या मुलाचे प्राण वाचले आहेत.


लहान मुलांचे खेळणे कधी जीवावर बेतेल सांगता येत नाही. चंद्रपुरात एका सहा वर्षांच्या मुलासोबत असाच काहीसा प्रकार घडला. घरात लोहचुंबकाशी खेळत असताना, आई-वडील जवळ नसल्याची संधी साधून या चिमुकल्याने लोहचुंबक तोंडात टाकले आणि ते थेट त्याच्या पोटात गेले. मुलगा रडायला लागल्यानंतर ही बाब पालकांच्या लक्षात आली आणि एकच खळबळ उडाली.


पालकांनी तात्काळ धाव घेतली ती म्हणजे चंद्रपुरातील प्रख्यात गॅस्टोएन्टेरॉलॉजी तज्ज्ञ डॉक्टर राहुल सैनानी यांच्याकडे. मात्र, पेच असा होता की, मुलाने काही वेळापूर्वीच जेवण केले होते. अशा स्थितीत तांत्रिकदृष्ट्या 'भूल' देणे कठीण होते. पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. सैनानी यांनी मोठा निर्णय घेतला.


मुलाची अवस्था पाहून आम्ही वेळ न घालवता शस्त्रक्रियेऐवजी एंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. भूल न देता, अत्यंत सावधगिरीने केवळ २ मिनिटांत तो लोहचुंबक बाहेर काढला. असे डॉक्टर राहुल सैनानींची यांनी सांगितले. कोणतीही चिरफाड न करता, केवळ दुर्बिणीच्या साह्याने हे लोहचुंबक बाहेर काढण्यात आले. यामुळे मुलाला होणारा मोठा त्रास आणि संभाव्य मोठी शस्त्रक्रिया टळली आहे. या यशस्वी उपचारामुळे चिमुकल्याला जीवदान मिळाले असून पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.