Mul News: मुल येथील कृषी महाविद्यालयाचा अनोखा विक्रम; 'स्वच्छता ही सेवा' उपक्रमाचा ५०० वा टप्पा साजरा

Bhairav Diwase
मुल:- मुल येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'स्वच्छता ही सेवा' या अभिनव उपक्रमाचा ५०० वा टप्पा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मे २०१७ पासून सातत्याने सुरू असलेल्या या मोहिमेने आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून, या निमित्ताने महाविद्यालयाच्या सोमनाथ येथील प्रक्षेत्रावर मान्यवरांच्या हस्ते ७० फणसाच्या रोपांची लागवड करण्यात आली.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजय अतकरे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष लाडे यांनी रासेयोच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.



यावेळी वरिष्ठ पत्रकार चंद्रकांत मणियार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रासेयोचे महत्त्व पटवून दिले, तर ग्राहक मंचचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हिताचे जतन करण्याचे आवाहन केले. 'ॲग्रोवन'चे प्रतिनिधी विनोद इंगोले यांनी महाविद्यालयाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. युवा वॉरियर्सचे अध्यक्ष सोहम बुटले यांनी विद्यार्थ्यांना डॉ. अतकरे यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.



आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वरिष्ठ प्रशिक्षक डॉ. जयश्री गलगलीकर यांनी पर्यावरणातील कचऱ्याच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकला. चंद्रशेखर गलगलीकर यांनी कवितेच्या माध्यमातून सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. रमाकांत गजभिये यांनी फणसाच्या लागवड तंत्रज्ञानाची माहिती दिली.


आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय अतकरे यांनी २०१७ पासूनच्या या प्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, "फणसाचे झाड हे खऱ्या अर्थाने कल्पवृक्ष असून, विद्यार्थ्यांनी केवळ महाविद्यालयातच नव्हे तर आपल्या घरी आणि शेतातही याची लागवड करावी." तसेच त्यांनी आजवर सहकार्य करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि तुळशीचे रोप देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गीतांशू डिंकवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. नागेश नवघरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण महाविद्यालय प्रांगणात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा. मलेकर, प्रा. खोकले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.