Murder News: किरकोळ वादाचा थरार! मित्रानेच केली मित्राची हत्या

Bhairav Diwase

गोंडपिपरी:- किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात होऊन एका २० वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मित्रानेच मित्रावर धारदार चाकूने हल्ला केल्याची ही हृदयद्रावक घटना वढोली गावात घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील काही युवक नेहमीप्रमाणे एकत्र बसून चर्चा करत होते. याच दरम्यान वैभव साईनाथ आळे आणि परिमल झाडे या दोन मित्रांमध्ये जुन्या कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या परिमलने जवळ असलेल्या धारदार चाकूने वैभववर प्राणघातक हल्ला केला.


रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वैभवला गावकऱ्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्याला चंद्रपूर येथे हलवण्यात आले. तिथे शस्त्रक्रिया सुरू असतानाच वैभवची प्राणज्योत मालवली. ऐन तारुण्यात वैभवचा मृत्यू झाल्याने वढोली गावावर शोककळा पसरली आहे.


घटनेची गांभीर्य ओळखून गोंडपिपरीचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी तातडीने पथकासह घटनास्थळ गाठले. सध्या आरोपी परिमल झाडे हा फरार असून, पोलीस त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी रवाना झाले आहेत. किरकोळ वादातून ओढवलेल्या या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.