Chandrapur News: चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्या तक्रारी!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- शिस्तप्रिय आणि कॅडर बेस पार्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटांमधील वाद विकोपाला गेला असून, दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत. चंद्रपूर भाजपच्या इतिहासात पक्षांतर्गत वाद पोलिसात जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळबळ उडाली आहे.


चंद्रपूर महानगरपालिकेची ३ जुलैला होणारी सर्वसाधारण सभा महापौरांनी अचानक स्थगित केली आणि यावरूनच भाजपमधील अंतर्गत वादाचा ज्वालामुखी फुटला. सभा स्थगित झाल्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांचा समर्थक गट कमालीचा आक्रमक झाला. या गटाच्या नगरसेवकांनी महापालिकेत एकत्र येत महापौर संगीता खांडेकर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुनगंटीवार गटाच्या मानल्या जाणाऱ्या महापौर खांडेकर यांनी या नगरसेवकांना भेटणे टाळले.
महापौर भेट देत नसल्याने संतप्त झालेल्या जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी थेट महानगरपालिकेत ठिय्या मांडला आणि भजनाला सुरुवात केली. वातावरण तापलेले असतानाच, तिथे मुनगंटीवार गटाचे नगरसेवकही दाखल झाले. त्यानंतर दोन्ही गट आमनेसामने आले. सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली, मात्र पाहता पाहता या वादाचे रूपांतर थेट धक्काबुक्कीत झाले.


सत्ताधारी पक्षाचेच दोन गट महापालिका आवारात एकमेकांवर चालून जात असल्याचे पाहून नागरिक आणि कर्मचारीही अवाक झाले. गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष सुरू आहे, त्याचीच परिणीती आजच्या या राड्यात पाहायला मिळाली.


हा वाद महापालिकेपुरता मर्यादित राहिला नाही, तर दोन्ही गटांनी थेट पोलीस ठाणे गाठत एकमेकांविरोधात रीतसर तक्रारीचे निवेदन दिल्या आहेत. महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी पक्ष आता स्पष्टपणे दोन गटांत विभागला गेला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे चंद्रपुरात भाजपच्या शिस्तप्रिय प्रतिमेला मोठा तडा गेला असून, विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. आता यावर भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.