चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या काही दिवसांत जे काही घडले, त्याने केवळ चंद्रपूरकरांचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. 'एक पक्ष, एक विचार' आणि 'शिस्तप्रिय पक्ष' अशी स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा (भाजप) अंतर्गत कलह आता थेट रस्त्यावर आणि पोलीस ठाण्यांपर्यंत पोहोचला आहे. ज्या पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांकडून नेहमीच मूल्यांची आणि शिस्तीची भाषा केली जाते, त्याच पक्षाचे नगरसेवक लोकशाहीच्या पवित्र मंदिरात म्हणजेच महानगरपालिकेत एकमेकांच्या अंगावर धावून जातात, एकमेकांना धक्काबुक्की करतात, ही अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब आहे.
या संपूर्ण प्रकरणाची ठिणगी पडली ती ३ जुलै रोजी होणारी मनपाची बहुप्रतीक्षित सर्वसाधारण सभा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यामुळे. लोकशाहीत चर्चा आणि संवादाला महत्त्व असते, पण इथे तर सभेचा अजेंडा आणि स्वतःच्या मर्जीतील स्वीकृत सदस्यांची नावे समाविष्ट नसल्याच्या कारणावरून सभाच गुंडाळण्यात आल्याचा आरोप होत आहे. जर सत्ताधारी पक्षालाच आपल्या अंतर्गत बाबी सांभाळता येत नसतील, तर त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर सभा कशा चालवाव्यात? हा प्रश्न निर्माण होतो. सभा रद्द झाल्याचे समजताच आमदार किशोर जोरगेवार गटाच्या नगरसेवकांनी थेट मनपा आयुक्तांच्या कार्यालयाला वेढा घातला, अन् ठिय्या दिला. हे चित्र एका जबाबदार सत्ताधारी पक्षाला शोभणारे नक्कीच नाही.
*गटातटाचे राजकारण आणि सत्तेची हाव:*
हा वाद केवळ एका सभेपुरता मर्यादित नाही, तर हा चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या दोन बड्या नेत्यांमधील वर्चस्वाचा आणि इगोचा (अहंकाराचा) लढा आहे. ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार गट विरुद्ध आमदार किशोर जोरगेवार गट यांच्यातील ही सुप्त लढाई आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. महापौर संगीता खांडेकर यांच्याविरोधात भाजपच्याच दुसऱ्या गटाने 'हाय हाय'च्या घोषणा देणे, यावरून पक्षातील अंतर्गत धुसफुस आणि गटबाजी किती विकोपाला गेली आहे, हे स्पष्ट होते.
महानगरपालिकेत जनतेने भाजपला कौल दिला नव्हता मात्र कॉंग्रेसच्या गटबाजीमुळे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली. भाजपा महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली तो शहराचा विकास करण्यासाठी, ना की लोकप्रतिनिधींचे आपापसातील राडे पाहण्यासाठी. मुनगंटीवार गट आणि जोरगेवार गट यांच्यातील या राजकीय भूकंपाने मनपा प्रशासनालाही ओलीस धरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
*लोकशाहीच्या आखाड्यात नगरसेवक आपापसात भिडले:*
चंद्रपूर महानगरपालिकेच्या आवारात काल सत्ताधारी भाजपच्याच दोन गटांमध्ये झालेली धक्काबुक्की पाहून सामान्य नागरिकांना कुस्तीची आठवण झाली. ज्याप्रमाणे आखाड्यात दोन स्पर्धक जिंकण्यासाठी लढतात. तसाच काहीसा संताप आणि आक्रमकता काल मनपाच्या दालनात नगरसेवकांमध्ये पाहायला मिळाली. आमदार मुनगंटीवार गट आणि आमदार जोरगेवार गटाचे लोकसेवक कुठलेही भान न राखता एकमेकांच्या अंगावर धावून गेले. सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली, अन् पाहता पाहता या लोकप्रतिनिधींनी शिस्तीचा बुरखा फाडत थेट "आखाडा" सुरू केला. एकमेकांना ढकलणे आणि घोषणाबाजी करणे यामुळे महापालिकेचा परिसर एखादी राजकीय सभेऐवजी आखाडाच बनला. सत्तेची हाव आणि अंतर्गत वर्चस्वाच्या इर्षेपोटी पक्षाची अब्रू आणि जनतेचे प्रश्न वेशीवर टांगून हे नगरसेवक ज्या पद्धतीने आपापसात भिडले, त्याने लोकशाहीच्या या पवित्र मंदिराची कमालीची नाचक्की झाली.
*‘शाब्दिक चकमक, घोषणाबाजी, राडा अन् थेट पोलीस तक्रारीं’:*
चंद्रपूर महानगरपालिकेतील या सत्तासंघर्षाचा प्रवास ‘शाब्दिक चकमक, घोषणाबाजी, राडा अन् थेट पोलीस तक्रारीं’ पर्यंत जाऊन पोहोचला. मनपाच्या आवारात दोन्ही गटांचे नगरसेवक आमनेसामने आले, तेव्हा सुरुवातीला केवळ टोमणे आणि शाब्दिक चकमकीने ठिणगी पडली. मात्र, काही वेळातच या वादाला इर्षेचे धुमारे फुटले आणि दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात 'हाय हाय' अशी तीव्र घोषणाबाजी सुरू झाली. ही घोषणाबाजी इतकी टोकदार ठरली की, बघता बघता शांततेच्या वातावरणाचे रूपांतर एका हिंसक राड्यात झाले आणि लोकप्रतिनिधी एकमेकांच्या अंगावर धावून गेले. हा अभूतपूर्व गदारोळ केवळ महापालिका इमारतीपुरताच मर्यादित राहिला नाही; तर हा वाद अधिकच विकोपाला गेल्याने अखेर दोन्ही गटांनी पोलीस ठाणे गाठून एकमेकांविरुद्ध रीतसर तक्रारी दाखल केल्या. भाजपच्या इतिहासात पक्षांतर्गत वाद थेट पोलिसांच्या उंबरठ्यापर्यंत जाण्याची ही अत्यंत दुर्दैवी घटना ठरली आहे.
*विरोधकांच्या हाती आयते कोलीत:*
सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, महापालिकेच्या आवारात एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत गेलेले हे नगरसेवक नंतर थेट शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र तिथे गेल्यानंतर सुध्दा हा वाद थांबला नाही. पोलीसांच्या समोरच पुन्हा दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केले. चंद्रपूर भाजपच्या इतिहासात अंतर्गत वाद पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यापर्यंत जाण्याची ही पहिलीच वेळ असावी. या अभूतपूर्व गोंधळामुळे भाजपच्या तथाकथित कॅडर बेस आणि शिस्तप्रिय प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधाऱ्यांमधील हा उघड संघर्ष विरोधकांच्या हाती आयते कोलीत देणारा ठरला आहे.
*थोडक्यात सांगायचे तर...*
चंद्रपूर मनपातील हा राडा म्हणजे सत्तेच्या केंद्रीकरणाची आणि आपापले वर्चस्व राखण्याच्या धडपडीची परिणती आहे. लोकप्रतिनिधींनी जर स्वतःचे भान गमावून जनतेच्या पैशांवर चालणाऱ्या मनपा कार्यालयाला आखाडा बनवले, तर जनतेने कोणाकडे पाहायचे? आता चेंडू भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात आहे. ते या दोन्ही गटांमधील वाद मिटवून पक्षाची अब्रू वाचवतात की चंद्रपूर मनपाचा हा आखाडा असाच सुरू राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण या सगळ्यात चंद्रपूरच्या जनतेचा आणि विकासाचा मात्र बळी जात आहे, हे नक्की!

