१६ ऑक्टोबर १९५६ हा दिवस चंद्रपूरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. नागपूरला ऐतिहासिक धम्मदीक्षेचा कार्यक्रम संपवून. डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक दिवस नागपूरला थांबले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची तब्येत ठीक नव्हती. तरीही प्रकृतीची तमा न बाळगता धम्मचक्र प्रवर्तनाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर १६ ऑक्टोबरला नागपूरहून उमरेडमार्गे चंद्रपूरला आले होते. येथील विश्राम भवनावर बाबासाहेबांचे वास्तव्य होते.
नागपूरच्या धम्मचक्रप्रवर्तनानंतर तो मान चंद्रपूरकरांना प्राप्त झाला होता. चंद्रपूरच्या या धम्मदीक्षा समारंभाकरीता जुना वरोरा नाक्याजवळील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या मागची जागा निवडण्यात आली होती. या धम्मदीक्षेचे प्रमुख सूत्रधार डॉ. बाबासाहेबांचे मानसपुत्र राजाभाऊ खोब्रागडे हे होते. त्यासाठी त्यांनी एक महिन्यापासून या कार्यक्रमासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन डॉ. बाबासाहेबांनी चंद्रपूर येथील धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाला होकार दिला होता. नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही धम्मदीक्षेच्या कार्यक्रमात थोडा फरक असा कि, नागपूरच्या त्या ऐतिहासिक समारंभात डॉ. बाबासाहेबांनी प्रथम भिक्कू चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धम्मात प्रवेश केला व नंतर त्यांनी उपस्थित लाखोंच्या जनसागराला धम्मदीक्षा दिली. चंद्रपूर येथील कार्यक्रमात मात्र खुद्ध बाबासाहेबांच्या हस्ते धम्मदीक्षा ग्रहण केली. सिरोंचा, अहेरी, आरमोरी, बल्लारशाह, चिमूर, गडचांदूर, गाडीसुरला, पोंभुर्णा, नवरगाव, माढेळी, मुल, वरोरा, भद्रावती, चामोर्शी, गडचिरोली, सुशी, नागभीड या भागातल्या ३९ बिनीच्या कार्यकर्त्यांची टीम या धम्मदीक्षेच्या कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेत होती. हे हि कौतुकास्पद आहे. समता सैनिक दलाने या मैदानावर अत्यंत चोख व कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. अत्यंत गाजलेल्या दादामहल समता सैनिक दलाकडे हि जबाबदारी होती. त्यांची हि शिस्त व कामगिरी पाहून खुद्द डॉ. बाबासाहेबांनी या सैनिकांची पाठ थोपटली होती. १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथे आणि १६ ऑक्टोबर १९५६ ला चंद्रपूर येथे बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन करून बुद्धाशिवाय जगाला दुसरा पर्याय नाही हे दाखवून दिले.
“तुम्हा सर्वांना या ऐतिहासिक दिनाच्या खूप खूप सदिच्छा..."