खडसेंची नाराजी आणि भाजपचे न झालेले नुकसान.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 24, 2020

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी महसूलमंत्री व माजी विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी कालच भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपने मोलाचा बहुजन चेहरा गमावला आहे व त्यामुळे आगामी काळात भाजपला मोठे नुकसान सोसावे लागेल, अशी सध्या चर्चा रंगली आहे. पण, खडसेंच्या नाराजीकाळातले उत्तर महाराष्ट्रातील निवडणुकीचे आकडे मात्र वेगळीच कहाणी सांगतात.

भोसरी येथील भूखंड खरेदीप्रकरण व अन्य आरोपांमुळे गदारोळ उठल्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथराव खडसे यांनी जून २०१६ मध्ये राज्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथराव खडसे यांच्याकडे महसूल व कृषी यासह अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी होती. आपल्यावर खोटेनाटे आरोप करण्यात आल्याचे त्यांनी त्या वेळीच सांगितले होते. पक्षाच्या सूचनेनुसार राजीनामा दिल्याचे त्यांनी अलीकडे मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे; अर्थात ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची जून २०१६ पासून भारतीय जनता पक्षाबद्दल विशेषतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी आहे. अपेक्षेप्रमाणे काही महिन्यांतच निर्दोष ठरून आपण मंत्रिमंडळात परतू शकलो नाही, याबद्दल खडसे यांची नाराजी वाढतच गेली. त्यांनी त्यांच्या पद्धतीने फडणवीस सरकारवर विधानसभेत व बाहेरही टीका केली. ‘खडसे यांचा भाजपला घरचा आहेर,’ अशा बातम्या वेळोवेळी झळकल्या. खडसे हे बहुजनांचे नेते आहेत व भाजपच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नाराजीमुळे भाजपचे राज्यभर विशेषतः उत्तर महाराष्ट्रात नुकसान होणे अपेक्षित आहे, असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर जून २०१६ ते विधानसभा निवडणूक २०१९ या कालावधीत भाजपची उत्तर महाराष्ट्रातील कामगिरी पाहू. येथे उत्तर महाराष्ट्र म्हणजे नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर या पाच जिल्ह्यांचा विचार केला आहे. भाजपच्या संघटनात्मक रचनेनुसार या पाच जिल्ह्यांच्या समूहाला ‘उत्तर महाराष्ट्र’ म्हणतात.

हेही वाचा:- गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी..... 


खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर पाठोपाठ ऑक्टोबर २०१६मध्ये विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील सहा जागांची निवडणूक जाहीर झाली. त्यामध्ये जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा समावेश होता. या मतदारसंघांमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदान करून विधान परिषदेवर प्रतिनिधी निवडून देतात. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यापूर्वी खडसे यांचे समर्थक गुरुमुखदास जगवाणी बिनविरोध निवडून गेले होते. यावेळी पक्षाने जगवाणी यांचे तिकीट कापले व चंदुभाई पटेल यांना तिकीट दिले. पटेल यांना निवडून आणण्याची जबाबदारी तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांना दिली. जळगाव परिसरातील भाजपचे बहुतेक नगरसेवक खडसे यांचे समर्थक आहेत, असा समज असला तरी प्रत्यक्षात चंदुभाई पटेल निवडून आले.

एकनाथराव खडसे यांच्या जून २०१६च्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याच्या पाठोपाठ फेब्रुवारी २०१७ मध्ये जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक इतर जिल्हा परिषदांसोबत झाली. त्यामध्ये भाजपने एकूण ६७ पैकी ३३ जागा जिंकल्या. पक्षाला बहुमतासाठी केवळ एक जागा कमी पडली. यापूर्वी खडसे यांच्या प्रभावाच्या काळात जळगाव जिल्हा परिषदेत भाजपचे २३ सदस्य होते ते वाढून ३३ झाले. जवळच्या नाशिक जिल्हा परिषदेत तशी परंपरेने भाजपची फारशी ताकद नव्हतीच. पण, २०१७च्या निवडणुकीत भाजपचे १५ जिल्हा परिषद सदस्य नाशिकमध्ये निवडून आले. एकूण ७३ सदस्यांच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी आधीच्या चार सदस्यांच्या तुलनेत १५ सदस्य निवडून येणे ही प्रगतीच होती.

एकनाथराव खडसे यांची नाराजी कायम असताना, जून २०१६ ते विधानसभा निवडणूक ऑक्टोबर २०१९ या काळात उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, जळगाव, धुळे व अहमदनगर या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. जळगाव महानगरपालिकेत एकूण ७५ जागांपैकी ५७ जागा जिंकून भाजपने खणखणीत बहुमत मिळवले. त्या आधीच्या निवडणुकीत जळगाव महानगरपालिकेत भाजपचे 15 नगरसेवक निवडून आले होते. खडसे यांच्या एकमुखी नेतृत्वाच्या काळात भाजपने जळगाव महानगरपालिकेतील सुरेश जैन यांची सत्ता संपुष्टात आणण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. पण, त्याला यश आले नव्हते. पण, यावेळी भाजपने सुरेश जैन यांची ३५वर्षांची जळगाव महानगरपालिकेतील सत्ता संपुष्टात आणली व निर्विवाद सत्ता मिळवली. अशाच प्रकारे धुळे महानगरपालिकेत ७४ पैकी ५० जागा जिंकून भाजपने उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक महानगरपालिका दणदणीत बहुमताने जिंकली. विशेष म्हणजे, आधीच्या निवडणुकीत धुळ्यात भाजपचे केवळ तीन नगरसेवक निवडून आले होते. धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपला दुहेरी आव्हान होते.

एकीकडे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांची नाराजी, तर दुसरीकडे २०१४ साली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या अनिल गोटे यांचा थेट विरोध. पण, धुळे महानगरपालिकेत भाजपने बाजी मारली. मालेगाव महानगरपालिकेत भाजपला पूर्वी यश मिळालेले नव्हते. गेल्या निवडणुकीत भाजपचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता. यावेळी भाजपने खाते उघडले आणि नऊ नगरसेवक निवडून आले. अहमदनगर महानगरपालिकेत भाजपच्या नगरसेवकांची संख्या नऊ वरून १४झाली, तरी एकूण ६८जागांच्या तुलनेत हे फारच मर्यादित यश होते. एकनाथराव खडसे नाराज असताना, मे २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या व उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी जिंकल्या. विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपमध्ये धक्कादायक घडामोड घडली. काही ज्येष्ठ नेते-मंत्र्यांसोबत एकनाथराव खडसे यांना पक्षाने विधानसभेची उमेदवारी नाकारली. त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगर या खडसे यांच्या पारंपरिक मतदारसंघात उमेदवारी दिली. एव्हाना खडसे यांच्या नाराजीचा कडेलोट झाला होता व त्याचा फटका भाजपला बसणे अपेक्षित होते. खडसे यांना तिकीट नाकारल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त अस्वस्थता आहे व मतदारांमध्ये रोष आहे, अशीही चर्चा माध्यमांनी रंगवली. प्रत्यक्षात या निवडणुकीत काय झाले हे पाहण्यासारखे आहे.

विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये उत्तर महाराष्ट्रातील एकूण ४७ मतदारसंघांपैकी भाजपने सर्वाधिक १६ जिंकले व दुसर्‍या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस (१३) राहिली. काँग्रेसला सात तर शिवसेनेला सहा जागा मिळाल्या. दोन अपक्ष व तीन अन्य पक्षीय निवडून आले. प्रमुख पक्षांना मिळालेल्या मतांचा विचार केला, तर भाजपला सर्वाधिक २५,१४,७०६ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला दुसर्‍या क्रमांकाची २३,३४,७०७ मते मिळाली. शिवसेना (१३,६७,८७८ मते) व काँग्रेस (११,६०,८५०मते) हे अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या क्रमांकावर राहिले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीशी तुलना केली तर उत्तर महाराष्ट्रात भाजप १९वरून घसरून १६ जागांवर आली. शिवसेना आठवरून सहा, काँग्रेस दहावरून घसरून सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आठवरून वाढून १३ झाले. भाजपच्या ज्या जागा कमी झाल्या त्यामध्ये खडसे यांची मुक्ताईनगरची जागा व आ. हरिभाऊ जावळे यांची रावेरची जागा या जळगाव जिल्ह्यातील २०१४साली जिंकलेल्या दोन मतदारसंघांचा समावेश आहे. बाकी उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे व नाशिक जिल्ह्यांत भाजपने २०१४साली जिंकलेल्या जागा गमावल्या, असे घडले नाही. धुळे शहर हा भाजपने २०१४साली जिंकलेला मतदारसंघ जागावाटपात शिवसेनाला दिला होता व तेथे एमआयएमचा उमेदवार निवडून आला. पण, हा मतदारसंघ भाजपने गमावला, असे म्हणता येणार नाही. विधानसभा निवडणूक २०१९मध्ये उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला. या जिल्ह्यात भाजपने २०१४ साली जिंकल्या व २०१९साली गमावल्या, अशा चार जागा - कोपरगाव, नेवासा, राहुरी व कर्जत जामखेड - आहेत. या नुकसानीस खडसे यांची नाराजी कारणीभूत असेल, असे वाटत नाही.

पण, विधानसभा निवडणूक २०१९मध्ये भाजपला उत्तर महाराष्ट्रात अनेक जागा नव्याने मिळाल्या व परिणामी, पक्षाच्या एकूण जागा १९वरून १६वर आल्या, तरी भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिला. धुळे जिल्ह्यात शिरपूर मतदारसंघात २०१४साली काँग्रेसच्या तिकिटावर विजयी उमेदवाराने यावेळी भाजपच्या तिकिटावर यश मिळविले. नाशिक जिल्ह्यात बागलाण मतदारसंघ भाजपने राष्ट्रवादीकडून खेचला. नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदारांचे तिकीट कापून नवा उमेदवार दिला तरी जागा जिंकली. राधाकृष्ण विखे यांनी भाजपकडून निवडणूक लढविल्यामुळे शिर्डीची जागा जिंकली. बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंद्याची जागा खेचून आणली. याखेरीज गिरीश महाजन व जयकुमार रावल या मंत्र्यांप्रमाणे भाजपच्या प्रभावी नेत्यांनी आपल्या जागा कायम राखल्यामुळे एकूण भाजपची कामगिरी पहिल्या क्रमांकाची झाली. एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला मुक्ताईनगर व त्यांचा थेट प्रभाव असलेला शेजारचा रावेर मतदारसंघ गमावला नसता, तर भाजपची उत्तर महाराष्ट्रातील कामगिरी आणखी उंचावली असती. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथराव खडसे यांची नाराजी वाढत गेली. पण, त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या निवडणुकीतील कामगिरीवर फारसा विपरीत परिणाम झालेला दिसत नाही. उलट काही वेळा भाजपने अभूतपूर्व यश मिळविले, असे आकडेवारीवरून दिसते. भविष्यात काय होईल, हे पाहायचे.
:-दिनकर माहुलीकर