स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात होत असतानाच निवडणुकीच्या आचारसंहितेत पोलिस भरती अडकणार असल्याचे चित्र आहे.
२०२२ ते २०२५ पर्यंत वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला. वयोमर्यादा संपल्यामुळे पोलिस होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या तरुण-तरुणींसाठी ही मोठी संधी आहे. पण आता ते तरुण-तरुणी भरतीचा सराव करून थकले, पण भरती प्रक्रिया अजून सुरू होऊ शकलेली नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.
राज्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस शिपायांची पदे भरण्यात येणार आहेत. याबाबतची आदेश देण्यात आला आहे. पण सरकारी निर्णय जाहीर होऊन आता दोन महिने झाले तरी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालेली नसल्याचे इच्छुक तरुण-तरुणींनी नाराजी व्यक्त केली आहे.
आता ऑक्टोबर महिना संपत आला आहे. तरीही भरती प्रक्रिया सुरु होण्यासाठी पोलिस प्रशासना पातळीवर कुठलीही हालचाल दिसत नाही. नोव्हेंबरमध्ये पहिल्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन ते तीन टप्प्यात जानेवारी अखेरपर्यंत या निवडणुका असतील.
या आहारसंहितेच्या कालावधीत पोलिस भरती प्रक्रिया होणे अशक्य आहे. गृह विभागाच्या अंतिम मान्यतेनंतर भरतीची प्रक्रिया पुढे सुरू होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
पोलिस भरती आचारसंहिता संपल्यावर ऐन उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात (पहिल्यांदा मैदानी चाचणी घेतली जाते) सुरू होईल की काय, असा प्रश्न पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण- तरुणींमध्ये होत आहे. ऑगस्टमध्ये पोलिस भरतीचा शासन निर्णय निघाल्याने तरुण-तरुणींना मोठा आनंद झाला होता. पण आता त्यांचा आनंदावर विरजन पडणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.


