'माझे बाबा झिंगू घरात यावेत हे आदित्य दादांना रुचेल का?'
चंद्रपूर:- सध्या चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये दारुमुक्तीच्या लढ्याला व्यापक रुप आलं आहे. काही राजकीय नेत्यांनी या जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर येथील स्थानिक आदिवासी नागरिकांनी याविरोधात लढा पुकारला आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूरमधील एका 8वीच्या मुलीने दारुबंदीच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. यात तिने 'माझे बाबा झिंगू घरात यावेत हे आदित्य दादांना रुचेल का?' असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच या जिल्ह्यांमधील दारुबंदी न उठवता दारुबंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केलीया 8 वीच्या मुलीने आपल्या पत्रात म्हटलं आहे, 'माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्य दादांना रुचेल का? मद्यपी वाहनचालकाने निरपराध जनतेला चिरडून जावे किंवा माझ्या तेजस दादाच्या गाडीला धडक मारावी या विचारानेही अंग शहारते. आपण सर्व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज आहोत आणि माँ जगदंबेची ओटी जनतेची कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या करातून आम्ही कशी काय भरणार?'
'माझे बांधव, माता भगिनी आनंदाने सुखाने नांदोत अशी मागणी आपणच आपले सर्वांचे दैवत पंढरीच्या विठोबांकडे करतो. मग दारुबंदी उठवावी हा आपल्या मंत्री महोदयांचा अनाठायी आग्रह का असावा?' असा सवालही या आदिवासी मुलीने केला आहे.
आदिवासींनी अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन दारुबंदी केली.
या आदिवासी विद्यार्थीनीने म्हटलं, '1963 मध्ये गडचिरोलीतील गावागावांमध्ये आदिवासी नागरिकांनी आपल्या परंपरेनुसार अनवाणी पायांनी मुंबईला जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शरद पवारांना दारुबंदीसाठी 6 वर्षे सुरु असलेल्या आंदोलनांची माहिती दिली आणि आपल्या भावना पोहचवल्या होत्या.'
'आम्ही मुलांच्या चुका झाल्यास बाबा कान पिरगाळतात. शासनाने कायदे करणे आणि स्वनियंत्रण करणे या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कितीही समाजप्रबोधन केले तरीही कित्येक मद्यपी वाट चुकतात. अशांना समुपदेशनासह प्रसंगी कायद्याने योग्य वाट दाखविणे हे आम्हा सर्वांचे कर्तव्यच आहे असे मी मानते,' असंही या मुलीने आपल्या पत्रात नमूद केलं.
स्थानिक लोकप्रतिनिधी जेव्हा ही जनतेची मागणी आहे, असे म्हणतात, तेव्हा सगळ्यांना कळू द्या, की ही नेमकी कोणती जनता आहे? तुमच्या पक्षाच्या टोप्या व मफलर घालून हिंडणाऱ्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही जर जनता म्हणत असाल तर ते चुकीचे आहे. राहिली गोष्ट अवैध दारूची. मुळात कायदा- सुव्यवस्था राखणे व नियमांची कठोर अंमलबजावणी करणे ही शासन -प्रशासनाची जबाबदारी आहे. त्या फसव्या दारूबंदीला यशस्वी दारूबंदी करून दाखवणे, हे खरे आव्हान आहे; दारूबंदी उठविणे हा मार्ग नाही.