गडचिरोली:- येथून पाच किलोमीटर अंतरावरील गोगाव येथील एका महिलेस आज (दि. २५) दुपारी वाघाने ठार केले. मंजुळा बुधा चौधरी (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे. पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत महादवाडी गावानजीकच्या जंगलात ही घटना घडली.
मंजुळा चौधरी ही आज गावातील काही महिलांसह महादवाडी गावानजीकच्या जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेली होती. दरम्यान, दुपारी दीड वाजताच्या सुमारास झुडुपात लपून बसलेल्या वाघाने अचानक तिच्यावर हल्ला केला. यात ती जागीच ठार झाली. यावेळी अन्य महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. घटनेनंतर गावकऱ्यांनी जंगलाकडे धाव घेतली. वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी जंगलात धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली.
आठवडाभरापूर्वी गडचिरोली शहरापासून दीड किलोमीटर अंतरावरील चांदाळा मार्गावरील जंगलात वाघाने एका महिलेस ठार केले होते. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.