Pombhurna News: गोंडवाना आंदोलनाचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन; आजपासून अन्नत्याग सुरू!

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीच्या वतीने पोंभुर्णा येथील तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी २८ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्ते जगन येलके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून, प्रशासनाकडून अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने आज, ६ नोव्हेंबरपासून, जगन येलके आणि शिष्टमंडळाने अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.


प्रमुख मागण्या:
बहुजन समाजाच्या हितासाठी आणि तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी गोंडवाना आंदोलन आदिवासी चळवळीच्या वतीने खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:
∆ तालुक्यातील १० गावांना पेसा (PESA) कायदा लागू करण्यात यावा.
∆ बहुजन समाजाच्या महसूल व वन जमिनीचे कायमस्वरूपी पट्टे तातडीने मिळावेत.
∆ पोंभुर्णा तालुक्यातील मागील मोर्चातील आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे खारीज करावेत.
∆ पोंभुर्णा येथील इको पार्क मध्ये आदिवासी संस्कृतीचे जतन तात्काळ करण्यात यावे.
∆ केमारा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवई गावातील आदिवासी पौराणीक वास्तुलेख (आदिवासी समाजाचे दैवत) शासनाच्या स्तरावर नोंद करून जत्रेचे स्वरूप देण्यात यावे.
∆ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या धान, सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी.


आंदोलनाची पुढील भूमिका:
शासन-प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने आणि त्यांची पूर्तता न केल्याने आंदोलनकर्ते जगन येलके व शिष्टमंडळ यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.