चंद्रपूर:- जिल्ह्यातील हजारो तरुण-तरुणी पोलिस भरती आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलात (जिल्हा स्टेडियम) सरावासाठी येतात. मात्र, या तरुणाईचा सरावाचा आधार ठरणारे हेच मैदान सध्या दुरवस्थेत आहे. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे खेळाडूंना शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे आणि मूलभूत सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. स्टेडियमवरील समस्या त्वरित सोडवाव्यात, अन्यथा विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलन करण्याची इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक सचिन भोयर यांनी प्रशासनाला दिला.
पोलीस व अन्य भरती बातम्या 2
यासंदर्भात त्यांनी निवेदनही दिले आहे. स्टेडियममधील ऑरो प्लांटमधील पाणी दूषित आहे. पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ, किडे आणि गढूळ पाणी साचले आहे. हेच पाणी खेळाडूंना प्यावे लागते, ज्यामुळे रोगराईचा धोका वाढला आहे. स्टेडियममधील स्वच्छतागृहांची सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. महिलांच्या प्रसाधनगृहांची परिस्थिती आणखीच गंभीर आहे. काही शौचालये कुलूपबंद असल्याने खेळाडूंना वापरण्याचीही सोय नाही. मैदानावर कचरा, झुडपे आणि पाणी साचलेले आहे. कोट्यवधींच्या सिंथेटिक ट्रॅकवर पावसाचे पाणी साचते. मैदानावर सर्वत्र झुडपे आणि भंगार पसरलेले आहे. दरम्यान, टूर्नामेंटच्या नावाखाली वारंवार मैदान बंद ठेवले जात असल्याने सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर धावावे. पहाटेच्या सरावावेळी पथदिवे बंद असल्याने अंधारातच खेळाडूंना धावावे लागते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक सचिन भोयर यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडविण्याची मागणी केली. समस्या तातडीने न सोडविल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.


