ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील टोल नाक्यासमोरील शासकीय तंत्रनिकेतन जवळ गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक १२ च्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत झाला.
मृत व्यक्तीचे नाव आशिष राजेश्वर बागडे (३२) असून तो मौजा माहेर, तालुका ब्रम्हपुरी येथील रहिवासी आहे. तर विजय किसन नागापुरे (४०) हा त्याच गावचा असून तो गंभीर जखमी झाला आहे. जखमी नागापुरे यास तातडीने उपचारासाठी स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष आणि विजय हे दोघे एमएच ३४ सीपी ०४९० या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात असताना राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक १२, च्या एमएच १२ वीएफ २०४३ या क्रमांकाच्या वाहनाने शासकीय तंत्रनिकेतनजवळ जोरदार धडक दिली. धडकेचा जोर एवढा होता की दुचाकी काही अंतरावर फेकली गेली आणि आशिषचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. पोलिसांनी एमएच १२ वीएफ २०४३ हे वाहन ताब्यात घेत चालकालासुद्धा ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक वाटकर करीत आहे.


