Top News

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपुर-मोहर्ली मार्गावरील 63 गतिरोधकानी ग्रामस्थ त्रस्त.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पा च्या परिसरात राहणाऱ्या 15 गावांतील ग्रामस्थांमध्ये आणि ताडोबा प्रशासनामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाचं कारण आहे, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर-मोहर्ली मार्गावर लावण्यात आलेले 63 स्पीडब्रेकर. स्पीडब्रेकरमुळे ग्रामस्थांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात असलेल्या मुधोली गावातील या मुलाचा रविवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. मात्र स्थानिक गावकऱ्यांच्या मते, ताडोबा प्रशासनानं चंद्रपूर-मोहर्ली मार्गावर लावलेल्या स्पीडब्रेकरमुळे या मुलाला चंद्रपूरच्या दवाखान्यात उपचारासाठी न्यायला उशीर झाला आणि त्यामुळेच हा 15 वर्षीय मुलगा दगावला. यानंतर ग्रामस्थांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतला. वनविभागाच्या कार्यालयासमोर मुलाचा मृतदेह ठेवून स्थानिक गावकऱ्यांनी वनविभागाविरोधात आपला रोष व्यक्त केला आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर-मोहर्ली मार्गावर घनदाट जंगल आहे आणि या जंगलात वन्यप्राण्यांची संख्या देखील मोठी आहे. मात्र अतिशय वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे गेल्या काही महिन्यात अनेक वन्यजीव या मार्गावर मृत्युमुखी पडले असून अनेक प्राणी गंभीर जखमीही झाले आहेत. गेल्या काही महिन्यात वाहनांच्या धडकेत या मार्गावर एक सांभर, एक चितळ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. तर ताडोबातील प्रसिध्द असलेला खली या वाघाला मोठी दुखापत झाली. त्यामुळे ताडोबा प्रशासनाने या 19 किलोमीटरच्या मार्गावर तब्बल 63 स्पीड ब्रेकर लावून वाहनांची गती नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ताडोबा प्रशासनाचा हा निर्णय स्थानिक गावकऱ्यांच्या जीवाशी आला आहे.
ग्रामस्थ एकीकडे स्पीडब्रेकर विरोधात आक्रमक होत असतांना वनविभाग मात्र या सर्व सबबी चुकीचं असल्याचं सांगत आहेत. वाहनांच्या अतिवेगामुळे वन्यजीवांच्या मृत्यूसंख्येत वाढ होत असल्यामुळे आणि हा वनरस्ता आहे त्यामुळे हे करण्यात आल्याचं वनविभागाचं म्हणणं आहे.
स्पीडब्रेकर्सला विरोध करणारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ही 22 गावं शिक्षण, आरोग्य, रोजगार यासारख्या सर्वच महत्वाच्या गरजांसाठी चंद्रपूर शहरावर अवलंबून आहेत. अतिशय घनदाट जंगलात असलेली ही गावं प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी चंद्रपूर गाठतात. याशिवाय ताडोबा परिसरात असलेले हॉटेल-रिसॉर्ट यांना देखील प्रत्येक लहान-मोठ्या कामांसाठी याच मार्गाने चंद्रपूर गाठावे लागते. त्यामुळे वनविभाग आणि ग्रामस्थांमध्ये गतिरोधकामुळे निर्माण झालेला हा गतिरोध तातडीने दूर करणे आवश्यक आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने