💻

💻

चंद्रपूर येथील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय मागे घ्या.

तुळशीराम श्रीरामे यांची मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- दि.९ सप्टेंबर २०१९ रोजी चंद्रपूर येथे मंजूर झालेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे कार्यालय रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी आदिवासी माना जमातीचे नेते तथा भद्रावती तालुका भाजपा अध्यक्ष तुळशीराम श्रीरामे यांनी येथील तहसीलदार महेश शितोळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
      तुळशीराम श्रीरामे यांनी दिलेल्या निवेदनानुसार,दि.३ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पालघर, नाशिक-२, धुळे, किनवट जि.नांदेड, यवतमाळ, गोंदिया आणि चंद्रपूर येथे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीची कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतू दि.२० मे २०२१ च्या एका परिपत्रकानुसार चंद्रपूर येथील नियोजित कार्यालय रद्द करुन गडचिरोली येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. गडचिरोली येथे सदर कार्यालय झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, जिवती, कोरपना, भद्रावती, वरोरा, चिमूर, चंद्रपूर, बल्लारपूर अशा लांब अंतर असणा-या तालुक्यातील नागरिकांना बसेसची अडचण, पैसा व वेळ यांचा अपव्यय एकाच दिवशी काम न झाल्यास मुक्कामाची अडचण अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. चंद्रपूर येथे कार्यालय झाल्यास या समस्या निर्माण होणार नाहीत.
त्यामुळे चंद्रपूर येथील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा व चंद्रपूर येथेच कार्यालय सुरु करण्यात यावे, अन्यथा भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात  येईल असा इशाराही निवेदनातून श्रीरामे यांनी दिला आहे.
      निवेदनाच्या प्रती आदिवासी विकास मंत्री, सचिव आदिवासी विकास विभाग, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा, माजी केंद्रिय मंत्री हंसराज अहीर, माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, वरोरा उपविभागीय अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत