राजकारण म्हणजे करिअर समजून काम करणाऱ्या तरुणांसाठी दादांचे नेतृत्वगुण हे दिपस्तंभ'च! #Chandrapur #birthday

लेख:- मंगेश मादेशवार
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा भाजपचे 'कप्तान' आदरणीय देवराव दादा भोंगळे यांचा आज वाढदिवस!

सर्वसमावेशक, सर्वमान्य, निष्कलंक, चारित्र्यसंपन्न आणि आपल्या कामाप्रती प्रामाणिक असणारा हा युवानेता गेल्या दशकभरापासून चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.


एकेकाळी ठराविक लोकांची मक्तेदारी समजल्या जाणार्‍या घुग्घुस शहरात भाजपची पाळेमुळे घट्ट रोवण्यापासून ते वलय निर्माण करण्यापर्यंत, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या खांद्याला खांदा लावून घेतलेली मेहनत दादांना वयाच्या एकेविसाव्या वर्षीचं 'राज्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचा' 'सर्वात तरुण सरपंच' पदाने फळाला येईल, असे कुणालाच वाटले नसेल.


परंतू अपेक्षेने आलेल्या प्रत्येकाच्या अडचणीचे संपूर्ण निराकरण झालेच पाहिजे, या सुधीरभाऊंच्या सुत्राला आपल्या कार्यपद्धतीत तंतोतंत लागू करून 'सर्वांना-सदैव-सहकार्य' करण्याचा दादांचा स्वभाव हाच त्यांच्या आजवरच्या यशाचे गमक आहे, असे म्हणता येईल.
दादांना आज वयाची त्रेचाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. नित्यनेमाने ते सकाळी सहाला उठून सायकलिंग, योगा-प्राणायामाला प्राधान्य देतात आणि त्यातून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळेच पुढे दिवसभर कमालीची व्यस्तता असली तरी, दादा ताजेतवाने वाटतात.
सकाळपासून भेटीसाठी उभा ठाकलेला अभ्यागतांचा गराडा असो किंवा रात्री झोपेपर्यंत समस्या-अडचणींच्या फोन-मेसेजची गर्दी! या सगळ्यांना वेळ देण्याची दादांची हातोटी अनेकांना चक्रावून टाकते.
खरेतर, दादा एक 'मास लीडर' आहेत.
सरपंच, पं. स. सभापती, जि. प. सभापती ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि आता चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे 'कप्तान' हा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी असाच आहे.
कमी वयात दादांमध्ये दिसणारी अफाट आणि अचाट कार्यक्षमता पक्षश्रेष्ठींच्या नजरेत भरली आणि ते चंद्रपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. अर्थात जिल्ह्यात नव्या दमाने पक्षबांधणी व एक सक्षम पर्याय म्हणून एका अभ्यासू, आक्रमक वक्तृत्व असलेल्या शालीन नेतृत्वाची गरज ओळखूनच भाजप पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतलेला असावा, असे दादांकडे बघून वाटते.
एक दमदार युवानेता म्हणून दादांमध्ये हजरजबाबीपणा, अमोघ वक्तृत्व, एखादा विषय मांडण्याची त्यांची हातोटी, जिल्हाभर दैनंदिन दौरे, सतत जनसंपर्क आणि अतिशय महत्त्वाचा म्हणजे विनम्रपणा!
तो दादांमध्ये सहज दिसतो. नाही तर नुसतेच कडक इस्त्रीचे कपडे घालून नेत्यांच्या मधोमध मिरविणारे 'बघे' मी ही कमी वयात भरपूर पाहिलेत. दादांना आप्तस्वकीयांपेक्षा पक्षाचा कार्यकर्ता अधिक जवळचा वाटतो. त्यांच्या या स्वभावगुणामुळेचं जिल्ह्यातील शेकडो युवकांची मांदियाळी त्यांच्या अवती भवती दिसते.
साधारणतः गेली तीन वर्षे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून मिनी मंत्रालयाचा कारभार हाकताना दादांनी स्वतः सम्राटाच्या भूमिकेत न राहाता 'चाणक्या'च्या बुद्धीचातुर्यानेचं कारभार केला. विरोधकांकडून अनेकवेळा मार्गात उभे केलेले अडथळे, लोकहिताच्या निर्णयात विनाकारण विरोध अशा साऱ्या प्रतिकूलतेवर मात करत, दादा अत्यंत मुत्सद्दी आणि धोरणीपणे जिल्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी पुढे होते.
अनेकदा रास्त प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी न करता दीर्घकालीन उत्तर शोधण्यावर त्यांनी परिश्रम घेतले. याच काळात आदरणीय सुधीरभाऊ राज्य सरकारात मंत्री होते, त्यांच्या अभूतपूर्व सहकार्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासकामांची मालिका तयार करण्यात दादांचे मोठे योगदान राहिले आहे.
हे ग्रामीण भागात गावोगावी झालेले रस्ते, नाल्या, शुद्ध पाण्याचे आरओ, जि. प. च्या नविन शाळा-वर्गखोल्या, सभामंडपे, अंगणवाड्या, दवाखाने, पांदणरस्ते, स्मशानभूम्या अशा पायाभूत सोयी सुविधांबरोबरच ठिकठिकाणच्या नावीन्यपूर्ण विकासकामाच्या उद्घाटन/भूमिपूजनाचे फलक बघूनही सहज कळते.
याच काळात दादांनी जिल्हाभर फिरून गावोगावी वृक्षदिंडी नेली. त्या माध्यमातून वृक्षसंवर्धन व स्वच्छता याचे महत्व त्यांनी जनतेला पटवून दिले. हागणदारीमुक्त गाव, गावोगावी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, जि. प. शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस यावी म्हणून शाळांमध्ये संगणक प्रशिक्षण अशा कित्येक क्रांतिकारी निर्णयातून दादांनी ग्रामीण भागातील जनतेला विकासाच्या प्रवाहासोबत जोडण्यासाठी कष्ट घेतले.
एवढेच नव्हे, तर सरपंच, पं. स. सभापती असतांना विकासकांमाचा धडाका लावून दादांनी घुग्घुसचा चप्पा-चप्पा चमकवला. जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती झाल्यावर कॉन्वेंट-इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांपेक्षा माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी गुणवत्ता यादीत कसा येईल? यासाठी मिशन नवचेतना, नवरत्न स्पर्धां, अंगणवाड्या ते आंनदवाड्या यासारखे शैक्षणिक धोरण त्यांनी राबविले.

आज स्वपक्षाबरोबरच विविध पक्षांमध्ये अनेक रथी महारथी, धुरंधर नेते सक्रिय आहेत परंतू त्या सगळ्यांना आपले मुख्य विरोधक फक्त देवराव भोंगळे हेच वाटतात, हे एक प्रकारे दादांचे यशच आहे.
या यशामध्ये पक्षाची साथ आणि सुधीरभाऊंचा आशिर्वाद आहेच पण कष्ट हे दादांचे स्वतःचे आहेत. आणि हेचं निर्विवाद सत्य आहे!
जनसेवेची तीव्र ईच्छा आणि सामाजिक प्रश्नांची सखोल जाण असली तर, तुमच्या नेतृत्वाला तोड नाही. याचे सर्वोत्तम उदाहरण दादांनी २०१७ च्या जि. प. निवडणूकीत आपला पारंपारिक मतदार संघ सोडून घुग्घुसपासून १०० की. मी. अंतरावर असलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा-घोसरी क्षेत्रात जावून निवडणूक लढवलीचं नव्हे तर मोठ्या फरकाने जिंकून दाखवत आपल्या नावानी सेट केलं.
आज, दादा जिल्हा भाजपचे कप्तान आहेत.
एक कप्तान आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी ज्या पद्धतीने रणनीती आखतो, संघातील उणीवा दूर करण्यासाठी वेळेनुसार संघात बदल, सुम्क्ष निरीक्षण, गरजेपोटी शिस्त आणि संघातील प्रत्येक खेळाडूमध्ये चैतन्य निर्माण व्हावा यासाठी विश्वास भरतो. अगदी याच सूत्रबद्धतेने दादा आपल्या कार्यक्षेत्रात वावरतात. म्हणूनच की काय, जिल्ह्यामध्ये भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यानंतर दुसरं विश्वासार्हतेचे स्थान म्हणजे "देवराव दादा" आहेत..
दादा म्हणजे, जितका करारीपणा तितकीच भावनिकता, जितकं वडिलधारे मार्गदर्शन तितकंच मित्रत्वाच्या नात्याइतका मोकळेपणा, जितके जबाबदार तितकेच एका कुटुंबसदस्यांप्रमाणे कार्यकर्त्यांना हक्काचं आधार वाटावा असे. त्यांच्या कामाचा आवाका, समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी आणि त्यांच्या सामाजिक जाणीवा या सर्व गुणवैशिष्ट्यांचं मला दररोज अप्रूप वाटतं..
शेवटी एवढेच सांगेन, की राजकारण म्हणजे करिअर समजून काम करणाऱ्या माझ्या असंख्य तरुण मित्रांसाठी देवराव भोंगळे यांचे नेतृत्वगुण हे 'दीपस्तंभ'च आहेत....!!
अशा जिल्ह्यातील शेकडो युवकांच्या ऊर्जास्त्रोताला, युवा नेतृत्वाला... अर्थात 'आदरणीय दादांना' जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

त्यांच्या हातून अशीच लोकसेवा न थकता, न थांबता अविरत घडत रहावी आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी माता महाकाली चरणी प्रार्थना व दादांना पुढीच्या इनिंगसाठी भरपूर शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत