Top News

अन् त्याने चार वर्षीय चिमुकलीला भरलेल्या विहिरीत फेकले. #Gondpipari

गोंडपिपरी:- वडील कामावर आणि आई घरात काम करीत असताना चार वर्षीय चिमुकली घोडागाडीवर खेळत होती. अशातच गावातील एक १६ वर्षीय वेडसर तरुण तेथे आला आणि घोडागाडीची मागणी करू लागला.
मात्र, चिमुकलीने नकार देताच रागाच्या भरात त्याने त्या चिमुकलीला चक्क तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले. विहिरीतील पाईपचा आधार घेत चिमुकलीने आरडाओरड करताच आसपासच्या लोकांनी तिला बाहेर काढले व चिमुकलीचे प्राण वाचले. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील खराळपेठ गावात घडल्याची माहिती बुधवारी उजेडात आली.
पलक विकास गुडपल्ले (वय ४), रा. खराळपेठ असे या चिमुकलीचे नाव आहे. दैनंदिन नित्यक्रमाने विकास गुडपल्ले हे आपल्या कामावर गेले असताना त्यांची पत्नी ही घरातील कामे आटोपत होती. चार वर्षीय पलक ही बाहेर अंगणात घोडागाडी खेळत होती. अशातच गावातील तरुण अनिकेत भोयर हा तेथे आला आणि पलकला 'घोडागाडी मला दे' अशी मागणी करू लागला. मात्र पलकने अनिकेतला नकार देताच रागाच्या भरात अनिकेतने पलकला शेजारच्या तुडुंब भरलेल्या विहिरीत फेकले.

विहिरीत पडताच पलकने विहिरीतील पाईपला पकडून आरडाओरड सुरू केली. पलकच्या जोराने ओरडण्याचा आवाज येताच आसपासच्या लोकांनी धाव घेतली. अथक प्रयत्नातून तिला बाहेर काढले. तिचे प्राण वाचविले. एकंदरीत या संपूर्ण घटनेचा थरार बघता उपस्थित अनेकांची भंबेरी उडाली असून, ही घटना बुधवारी उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती घेतली असता अनिकेत भोयर हा वेडसर तरुण असून मनोरुग्ण असल्याने याबाबत पोलिसात कुठल्याही गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती मिळाली नाही आहे. तर घटनेत पलकला किरकोळ जखमा झाल्या असून तिला उपचारांकरिता रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने