नागभीड:- उन्हाळ्यात ग्रामीण भागात आणि विशेषत: जंगल परिसरातील गावांत मोहफुले वेचणे, तेंदुपत्ता गोळा करणे, टेंभरं, चारं या प्रकारचा रानमेवा विकणे इत्यादी वनांशी निगडित कामे करुन ग्रामस्थ उदरनिर्वाह करीत असतात. मात्र नागभीड तालुक्यातील कान्पा येथील आदिवासी युवक वर्षभर जंगली चिंचोळे विकून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावतो.
हेही वाचा:- चंद्रपूरात पाणी पेटले, मनपावर घागर फुटले
राजपाल रतनसिंग मरस्कोल्हे (२४) असे या आदिवासी युवकाचे नाव आहे. तो नागभीड तालुक्यातील कान्पा येथे आपल्या कुटुंबात राहतो. वन-औषधी असलेल्या जंगली चिंचेच्या बिया म्हणजेच जंगली चिंचोळे विकून तो आपला उदरनिर्वाह करतो. त्यासाठी त्याला वर्षभर भटकंती करावी लागते. गावोगावचे आठवडी बाजार तो करतो. एका बाजारात त्याला एक हजार ते बाराशे रुपयांची कमाई होते. तर कधी-कधी काहीच कमाई होत नाही.
जंगली चिंचोळा हा गावठी चिंचोळ्या पेक्षा आकाराने सहा ते सात पटीने मोठा असतो. एका चिंचोळ्याच्या आकारावरुनच जंगली चिंच किती मोठी असेल याची कल्पना येते. नेपाळच्या पहाडी जंगलातून हे चिंचोळे आणून किलोच्या भावाने विकले जातात. त्यानंतर राजपाल सारखे विक्रेते चिल्लर विक्री करतात. एका चिंचोळ्याची किंमत ३० रुपये आकारली जाते. तर दोन खरेदी केल्यास १० रुपयांची सुट दिली जाते.
जंगली चिंचोळा ही वन-औषधी असल्याने त्याचा उपयोग हातपाय, कंबर, मान दुखणे, हातापायाची आग होणे, मुंग्या येणे या व्याधीसाठी करता येते. दुखत असलेल्या भागावर चिंचोळ्याचे कवच काढून आत असलेली बी उगाळून लावता येते किंवा बियांचे पावडर करुन पावडर आणि पाणी सम प्रमाणात घेऊन मिश्रण करुन लावता येते. याचा कोणताही साईड इफेक्ट नसल्याचे राजपाल याचे म्हणणे आहे. हा त्याचा वडिलोपार्जित व्यवसाय असून त्याचे वडीलही हाच व्यवसाय करीत असल्याचे त्याने सांगितले.