Top News

महिला व बालविकास कार्यालयाने थांबविला अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह #chandrapur #gadchiroli


गडचिरोली:- जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यात होऊ घातलेला एका अल्पवयीन मुलगा आणि अल्पवयीन मुलीचा विवाह शासकीय यंत्रणेच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश आले. दोन्ही पक्षांकडील मंडळीची समजूत काढून त्यांचे समुपदेशन केल्यानंतर त्यांनी विवाह थांबविण्यास अनुमती दिली.
कालीनगर ग्रामपंचायतअंतर्गत लक्ष्मीपूर येथे एक बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाला मिळाली होती. त्यानुसार लगेच गडचिरोलीवरून जिल्हा बाल संरक्षण चमूने सदर बालविवाह रोखण्यासाठी विवाहस्थळ असलेले लक्ष्मीपूर गाठले. नियोजित वर-वधूंच्या वयाची पडताळणी केली असता मुलगी १८ वर्षाच्या आत तर मुलगा २१ वर्षाच्या आत होता. अखेर त्यांचे समुपदेशन करून नियोजित समारंभ थांबविण्यात आला.
सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ता जयंत जथाडे, संरक्षण अधिकारी मुलचेरा महेंद्र मारगोनवार, मनोज ढवंगाये, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार, लेखापाल पूजा धमाले यांनी केली. सदर बालविवाह थांबविण्यासाठी प्रभारी गटविकास अधिकारी मनोहर रामटेके व बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद हाटकर यांनी सहकार्य केले.
अशाप्रकारे जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे व चाइल्डलाइन टोल फ्री नंबर, १०९८ या क्रमांकावर बाल विवाह बाबत संपर्क साधावा. माहिती सांगणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.
दोघेही सज्ञान झाल्याशिवाय लग्न लावणार नाही

माहितीची शहानिशा झाल्यानंतर गावातील सरपंच पवन मंडल, पोलीस पाटील नागेन सेन, अंगणवाडी सेविका दीपू सरकार आणि अमियो सेन यांच्यासमक्ष मुलाचे घर गाठले. नियोजित वधू-वर यांचे आई-वडील आणि उपस्थित नातेवाईकांना हा बालविवाह केल्यास होणाऱ्या दुष्परिणामांबाबत माहिती देण्यात आली. वधूचे वय १८ वर्ष आणि वराचे २१ वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्यांचे लग्न लावून देणार नाही, असा जबाब नोंदविण्यात आला. पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत वर व वधू पक्षाने हमीपत्र लिहून दिले. याशिवाय बालिकेचेही समुपदेशन करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने