कोरची:- कोरची तालुक्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरुच असून, शुक्रवारी (ता.४) रात्री रानटी हत्तीने एका (७० वर्षीय) वद्धास पायाखाली तुडवून ठार केल्याची घटना तलवारगड गावात घडली. धनसिंग टेकाम असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. या हत्तींनी गावातील काही घरे आणि धानपिकांचेही नुकसान केले आहे.
तलवारगड हे गाव दुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असून, टिपागड डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. गावात ८ घरे आहेत. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास १५ ते २० रानटी हत्तींनी गावात प्रवेश केला. त्यांनी घरांची मोडतोड करुन शेतातील धानपिकाचीही नासधूस केली. त्यानंतर धनसिंग टेकाम या वृद्धास एका हत्तीने पायाखाली तुडवून ठार केले. त्यानंतर हत्तींनी आपला मोर्चा न्याहायकल गावाकडे वळविला. तेथील चम्मीबाई पुडो, सुखदेव कुरचाम व चैतू कुरचाम या तीन शेतकऱ्यांच्या शेतातील धानपीक तुडविले. घटनेनंतर मालेवाडा वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
शनिवारी (ता.५) या हत्तींनी गांगीन व प्रतापगड या गावांमध्ये प्रवेश करुन रमेश नैताम या शेतकऱ्याच्या धानाच्या गंजीला तुडवून पिकाचे प्रचंड नुकसान केले.
२० ऑक्टोबरच्या रात्री लेकुरबोडी येथील (८० वर्षीय) वृद्धेला हत्तीने सोंडेत उचलून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत.