Cultural and Achievement : कला आणि कर्तृत्वाचा संगम: चंद्रपूरची अष्टपैलू कन्या श्रुती निकुरे

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहेच, पण आजच्या काळात या भूमीतील तरुण पिढी आपल्या कलागुणांनी या वारशात मोलाची भर घालत आहे. महादेव मंदिर, बाबुपेठ, चंद्रपूर येथील श्रुती उत्तम निकुरे हे असेच एक नाव, ज्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर कला आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत.

शैक्षणिक वाटचाल आणि ध्येय:

श्रुती सध्या सरदार पटेल महाविद्यालयात इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवीच्या (M.A. English) पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहेत. केवळ पदवी मिळवणे हे त्यांचे उद्दिष्ट नसून, भविष्यात एक Lecturer बनण्याचे तिचे स्वप्न आहे. आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करणे, हीच श्रुतीची खरी प्रेरणा आहे.
सांस्कृतिक क्षेत्रातील 'सुवर्ण' कामगिरी:

श्रुती निकुरे यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत आयोजित विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये आपल्या अभिनयाचा आणि दिग्दर्शनाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या नावावर अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार आहेत:

अभिनय: झाडीबोली नाट्य संमेलनात सलग दोन वर्षे (२०२४ मध्ये प्रथम आणि २०२५ मध्ये द्वितीय) एकपात्री अभिनयाचा पुरस्कार पटकावून त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवली.
लेखन आणि दिग्दर्शन: केवळ अभिनयच नव्हे, तर लेखन आणि दिग्दर्शनातही त्या निपुण आहेत. २०२५ मध्ये त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'माईम' (Mime) नाटकाला गोंडवाना विद्यापीठात प्रथम पुरस्कार मिळाला. तसेच २०२६ मध्ये 'माईम' आणि 'प्रहसन' (Skit) मध्ये तृतीय क्रमांक पटकावला.

गायन: २०२६ च्या युवा महोत्सवात 'इंडियन ग्रुप साँग' मध्ये प्रथम पुरस्कार मिळवून त्यांनी आपल्या अष्टपैलूत्वाची प्रचिती दिली.
साहित्य आणि वक्तृत्वातही अव्वल:

श्रुतीची लेखणी तितकीच प्रगल्भ आहे. २०२५ मधील स्वरचित मराठी काव्य स्पर्धेत त्यांनी द्वितीय, तर हिंदी लघुकथा लेखनात प्रथम क्रमांक मिळवला आहे. वक्तृत्व स्पर्धेतही त्यांनी आपली छाप सोडली असून, त्यांच्या या सर्व कामगिरीची दखल घेत त्यांना '२०२६ ची सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट विद्यार्थिनी' म्हणून सरदार पटेल महाविद्यालयात गौरविण्यात आले आहे.

यशाचे आधारस्तंभ:

श्रुतीच्या या यशामध्ये त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. वडील उत्तम निकुरे नौकरी वर आहेत आणि आई कविता निकुरे (ज्या स्वतः एक यशस्वी बिझनेस वूमन आहेत) यांनी श्रुतीच्या कलागुणांना नेहमीच प्रोत्साहन दिले. भाऊ स्वप्निल निकुरे याचेही तिला सदैव सहकार्य लाभते.
गायन, वादन, नर्तन, अभिनय, सूत्रसंचालन आणि समाजसेवा अशा विविध क्षेत्रांत वावरणाऱ्या श्रुती निकुरे आजच्या तरुणाईसाठी एक आदर्श आहेत. कलेची उपासना करतानाच सामाजिक भान जपणाऱ्या श्रुतीची ही घोडदौड अशीच सुरू राहो, हीच सदिच्छा!