चंद्रपूर:- सिंदेवाही (Sindewahi) कृषी संशोधन केंद्रातर्फे सहयोगी संचालक डॉ. ए. व्हि. कोल्हे, विस्तार विद्यावेत्ता तथा प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. व्हि. जी. नागदेवते तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व संबधीत तालुका कृषी अधिकारी याचे उपस्थितीत नुकतेच जिल्हातील चिमुर, कळमगांव, वरोरा ( शेंगाव बु.) व भद्रावती (घोडपेठ) तालुक्यात कपाशीवरील किड व रोगाचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी कपाशीवर प्रामुख्याने गुलाबी बोंड अळी (bond adi) व दहीया रोगाचा प्रादुर्भाव दिसुन आला असता खालीलप्रमाणे उपाययोजना सुचविण्यात आल्या.
सर्वेक्षणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव हिरव्या बोंडात साधारणताः २ ते ५ टक्के आढळुन आला, तो आर्थीक नुकसान संकेत पातळी खाली असुन शेतकरी बंधुना तुर्त कोणत्याही रासायनिक किटकनाशकाचा वापर करण्याची आवश्यकता नाही. परंतु शेतकरी बंधुनी बोंडअळीसाठी आठवड्यात किमान एक वेळा सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी मध्यम पक्व झालेली एकसमान प्रतिझाड एक हिरवे बोंड याप्रमाणे प्रति एकरी २० बोंडे फोडुन त्यापैकी किमान त्यात १ अळी किवां दोन किडक बोंडे याप्रमाणे आढळल्यास शेतकरी बंधुनी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन ०.१५ टक्के प्रवाही २५ मि. लि. किंवा ब्युव्हेरीया बासीयाना ५० ग्रॅम प्रति / १० लीटर पाणी याप्रमाणे कोणत्याही एक जैविक घटकाची फवारणी करावी. तसेच शेतात एकरी किमान २ फेरोमोन सापळे लावावे. त्यात नर पतंग अडकणे सुरू झाल्यास वरीलप्रमाणे फवारणी करावी. हे प्रमाण सतत २ ते ३ दिवस ८ - १० पतंग / सापळा याप्रमाणे करावे. परंतु हे फेरोमन सापळे प्रत्येक कापुस उत्पादक शेतक-याने लावणे अत्यावश्यक आहे. परत एका आठवड्यात सर्वेक्षण करून प्रादुर्भावाचे प्रमाण वाढल्यास रासायनिक किटकनाशक क्लोरपायरीफॉस २० टक्के २५ मि.लि / १० लि. पाणी प्रवाही याप्रमाणे फवारणी करावी. #agriculture
तसेच सर्वेक्षणात भद्रावती (Bhadrawati) तालुक्यात घोडपेठ या गावात कपाशी वर दहीया रोगाचा प्रादुर्भाव दिसुन आला असुन ह्या रोगामध्ये नुकसानाची क्षमता मोठया प्रमाणात असल्यामुळे शेतकरी बंधुनी त्वरीत आपल्या कपाशी पिकाचे सर्वेक्षण करावे व ह्या रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास त्वरीत बुरशीनाशकाची फवारणी करावी. हा दहीया रोग कपाशीच्या खालच्या पानावर सर्वप्रथम येतो व तो वरच्या पानावर झपाट्याने पसरून संपुर्ण झाडाची पाने प्रादुर्भावग्रस्त होतात. पानावर प्रथम दही शिंपडल्यासारखे ठिपके दिसतात. हे ठिपके मोठे होउन पान पिवळे पडते व त्याला द्रोणासारखा आकार येवुन पान गळुन पडते. अल्पावधीतच संपुर्ण झाड पर्णहीन होते. त्यामुळे बोंडे भरण्याची / पक्व होण्याची प्रक्रिया बंद होउन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. तरी या रोगाची लागण होताच मिश्र बुरशीनाशक ॲझोक्सीस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के प्रवाही १० मि लि . / १० लीटर पाण्यात घेउन त्वरीत फवारणी करावी व गरज भासल्यास केसोक्सीम मिथाईल ४४.३ टक्के प्रवाही १० मि.लि. प्रति १० लीटर पाणी या प्रमाणे या मिश्र बुरशीनाशकाची १२ ते १५ दिवसाचे अंतराने दुसरी फवारणी करावी.
तरी कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व दहीया रोगावर वरीलवरील प्रमाणे उपाय योजना करण्याचे आवाहन सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे.