Click Here...👇👇👇

मुनगंटीवारांच्या पुढाकाराने उद्या रायगडावर होणार ३५०वा शिवराज्यभिषेक वर्ष सोहळा

Bhairav Diwase
3 minute read

चंद्रपूर:- छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा उद्या (ता. २ जून) रायगडावर भव्य रुपात साजरा होणार आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी करीत आहे. 

देशभरातल्या ११०८ पावन ठिकाणांहून आणलेले जल एकत्रित करून अभिषेक केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक ठरावा, पुन्हा तो क्षण विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राज्यातील जनतेपर्यंत पोहोचावा, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा जागर व्हावा, यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून मंत्री मुनगंटीवार यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यासाठी मौजे पाचाड, किल्ले रायगड यासोबतच मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे कार्यक्रम होणार आहेत. 

उद्या सकाळी ८.३० वाजता होणाऱ्या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार उदयनराजे भोसले, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार ज्ञानेश्‍वर म्हात्रे, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील, आमदार आदिती तटकरे, आमदार नरेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी, आमदार महेंद्र साळवी उपस्थित राहणार आहे. 

सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, श्री. शिवाजी रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष रघोजीराजे आंग्रे, शिराज्यभिषेक दीनोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कोकण कला मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रागयडचे फत्तेसिंह सावंत यांचीसुद्धा उपस्थिती राहणार आहे. 
अफजलखानाच्या कबरीभोवतालचे अतिक्रमण काढले

राज्याच्या सांस्कृतिक विभागाने आजवर कधी नव्हे ते उल्लेखनीय कार्य केलेले आहेत. प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा नेहमीच वादात राहात होता. त्यावरून अनेकदा आंदोलनेही झाली. न्यायालयीन खटले दाखल झाले. १० नोव्हेंबर २०२२ ला कडक बंदोबस्तात कबरीभोवतालचे अतिक्रमण पाडण्यात आले. कारवाईदरम्यान रस्ता बंद करण्यात आला होता. या संपूर्ण कारवाईच्या बाबतीत राज्य सरकारने कमालीची गोपनीयता पाळली होती. १० नोव्हेंबर १६५९ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला होता. ३६३ वर्षांनंतर सरकारने त्याच दिवशी ही कारवाई केली. 

वाघनखंबाबत ब्रिटनच्या उच्चायुक्तांचा मंत्री मुनगंटीवार यांना सकारात्मक प्रतिसाद

छत्रपतींनी जेव्हा अफजलखानाचा वध केला, तेव्हा वापरलेली वाघनखं महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या दर्शनासाठी उपलब्ध करून देण्याबाबत ब्रिटनच्या उच्चायुक्तांनी मंत्री मुनगंटीवार यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराजांची जगदंबा तलवार आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

राम मंदिरासाठी विदर्भातील लाकूड

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर येथून काष्ठ अयोध्या येथे  
राममंदिरासाठी पाठवण्यात आले. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला होता. जेथून लाकूड पाठवण्यात आले, त्या बल्लारपूर आणि चंद्रपुरात दोन शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. दंडकारण्यात ज्याचा उल्लेख आहे, त्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील लाकडाची निवड राम मंदिराच्या कामासाठी करण्यात आली आणि चंद्रपूरातून वाजत गाजत काष्ठ अयोध्येला पाठवण्यात आले. 

नव्या संसद भवनासाठीही चंद्रपूरचे लाकूड

भारतीय संसदेच्या नव्या इमारतीसाठी महाराष्ट्रातील चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सागवान लाकडाचा वापर करण्यात आला. त्यामुळे नवे संसद भवन आणि चंद्रपूर-गडचिरोलीचा अनोखा काष्ठबंध तयार झाले. या भवनासाठी लागलेले दगड राजस्थानातून तर लाकूड महाराष्ट्रातून आणण्यात आले आणि याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात केला होता. 

जय जय महाराष्ट्र माझा..

देशगिताप्रमाणे महाराष्‍ट्राचेही स्वतंत्र गीत असावे, ही मागणी नेहमीच केली गेली. पण ती याच सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास आली. ‘जय जय महाराष्ट्र माझा...’, हे महाराष्ट्रगीत असेल, ही घोषणा सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ३१ जानेवारी २०२३ रोजी केली. त्यामुळे आता 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत राज्याचे अधिकृत राज्यगीत झाले आहे. प्रेरणागीत म्हणून या गाण्याची ओळख आहे. देशातील ११ राज्यांचे स्वत:चे गाणे आहे. यामध्ये आता महाराष्ट्राचे देखील स्वत:चे गीत आहे.

प्रतापगड श्रीतुळजाभवानी देवी रजतछत्र अर्पण सोहळा

श्री शिवराज्याभिषेक सेवा समिती दुर्गराज रायगड या मुख्य संस्थेने महाराष्ट्रातील अनेक संस्थांना सोबत घेऊन हा भव्य रजतछत्र अर्पण सोहळा थाटामाटात साजरा केला. छत्रपती श्री शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक करण्याचे ठरल्यावर याची तयारी सुरु झाली होती. महाराज वैशाख कृष्ण एकादशीस प्रतापगडावर आले होते. भवानी देवीची पूजा आराधना केली आणि सव्वा मण सुवर्णाचे छत्र त्यांनी देवीस अर्पण केले होते. तिथे आई भवानी देवीच्या सानिध्यात तीन दिवस ते राहिले होते. या ऐतिहासिक प्रसंगाची स्मृती जागवावी आणि ते स्मृती पुष्प महाराजांच्या चरणी अर्पण करावे, हा मानस ठेऊन रजतछत्र अर्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.