चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळले मिथेन वायूचे साठे #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0


चंद्रपूर:- विदर्भातील आता पर्यंत खनिजे, मौल्यवान धातू, कोळसा आणि जीवाश्मे सापडले आहेत. त्यामध्ये मिथेन वायूच्या साठ्यांची भर पडली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात नव्याने व्यावसायिक मिथेन वायूचे साठे आढळले आहेत.


नैसर्गिक वायूंचे साठे समुद्रातच आढळत होते. परंतु पेट्रोलियम आणि प्राकृतिक गँस मंत्रालयाने २०१६-२०१७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारशा , गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, भद्रावती आणि वरोरा तालुक्यातील भूगर्भात ३३१ स्के./किमी भूभागात ३७ तर सिरोंचा ब्लॉक मध्ये ७०९ वर्ग/किमी परिसरात ४७ बिलियन क्युबिक मीटर एवढे मोठे कोल बेडेड मिथेनचे साठे सापडल्याची माहिती पर्यावरण आणि भूशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी दिली.


१९९६-९८ मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सर्वेक्षणाचा प्रयत्न झाला, परंतु आधुनिक तंत्रज्ञाना अभावी साठ्यांचे आकलन होऊ शकले नाही. त्यानंतर २०१६-२०१७ मध्ये आधुनिक वैद्यानिक पद्धतीने (२ ड्रील करून, २/३ D सिस्मिक सर्वे, जिओ सायन्टीफिक सर्वे, ग्रँव्हिटी आणि मेग्नेटीक सर्वे). सर्वे करण्यात आला. चंद्रपूर ब्लॉकचा पूर्व विदर्भातील प्राणहिता-गोदावरी बेसिन मध्ये समावेश आहे. ह्या श्रेणी-३ मध्ये येणाऱ्या बेसिनचे सविस्तर संशोधन केल्यानंतर येथे व्यावसायिक मिथेनचे साठे आढळले.


चंद्रपूर ब्लॉक चंद्रपूर सेडीमेंटरी मिथेन ब्लॉक ३३१ स्के/किमी परिसरात व्यापला असून ह्यात ३७ बिल्लीयन क्युबिक मीटर एवढे साठे अपेक्षित आहे. काही ठिकाणी खोल साठे जमिनी पासून ४ ते ५ किमी ( ४ ते ५ हजार मीटर वाळूच्या थरात ) इतक्या खोलवर आहेत. ह्या ब्लॉकमध्ये चंद्रपूर, बल्लारशा , गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, भद्रावती आणि वरोरा तालुक्याचा आणि तेलंगणाच्या उत्तर आदिलाबाद तालुक्याचा समावेश होतो. इथे १९९६-९८ साली सर्वे झाला. त्यानंतर मिथेनच्या साठ्यासाठी २०१६-१७ ते २०२२ पर्यंत विमानाच्या साहाय्याने सर्व्हे करण्यात आला. ह्यात २/३ D सिस्मिक सर्वे, जिओ सायंटीफिक सर्व्हे ,ग्रँवीटी अंड मँग्नेटीक सर्वे आणि ड्रील ह्या वैज्ञानिक पद्धतीने हा सर्वे पूर्ण करण्यात आला.


सिरोंचा ब्लॉक- सिरोंचा ब्लॉक हा गोंडपिंपरी तालुक्यापासून सिरोंचा आणि तेलंगाना क्षेत्रात येत असून त्याची व्याप्ती ७०९ वर्ग/किमी परिसरात असून त्यात ४७ बिलियन क्युबिक मीटर एवढे साठे आहेत. नागपूर ब्लॉक हा मजबूत बेसाल्ट खडकाच्या खूप आंत असून तो अजून व्यावसाईक दृष्ट्या सक्षम मानल्या गेला नाही. पुन्हा इथे सर्वेक्षण केल्या नंतर इथे किती साठे आढळतील ह्याचा अंदाज घेतल्या जाणार आहे. टेक्टाँनिक दृष्ट्या हा ब्लॉक चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पासून नागपूर च्या उत्तर सिमेपर्यंत व्यापला आहे. अस्वरापेठा ब्लॉक (तेलंगाना ) ह्यातील अस्वरापेठ हा ३८० वर्ग/किमी चा ब्लॉक ( GV(N)-CBM-2005/111) मिथेन च्या साठ्याने भरलेला असल्याने त्याची बोली लागली असून तो ब्लॉक कोल्गेस मार्ट लिमिटेड ला दिला आहे. पुन्हा जमितनीत किती साठे असू शकतात याकरीता हायड्रोकार्बन महानिदेशालय जाणून घेणार असल्याचे ग्रीन प्लानेट संस्थेचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे यांनी सांगितले आहे.


विदर्भ-तेलंगानात प्राणहिता गोदावरी बेसिन. विदर्भ आणि तेलंगाना राज्यात प्राणहिता-गोदावरी हे स्तरित खडकाचे संपूर्ण बेसिन ३०,००० वर्ग/किमी च्या अधिक परिसरात व्यापले असून त्याची लांबी जवळ जवळ ४०० तर रुंदी १०० किमी आहे. ह्या भूभागात भूपट्टीय दृष्ट्या नागपूर, चंद्रपूर- सिरोंचा ते तेलंगाना मधील अस्वरापेटा हे ४ भाग पाडण्यात आले आहेत. महाराष्ट्रात व्यावसाईक दृष्ट्या २ तर तेलंगनात ३ ब्लॉक्स पाडण्यात आले आहेत. विदर्भात कोल बेडेड मिथेनचे ८४ बिल्लीयन क्यूबिक मीटर ( ९४.४ मिलियन मेट्रिक टन ) इतके साठे आढळले आहेत. ह्यातील नागपूर ब्लॉक मध्ये अल्प साठे असले तरी व्यावसाईक दृष्ट्या त्याला अजून मान्यता मिळाली नाही.

चंद्रपूर ब्लॉक साठी ओएनजीसी कंपनी इच्छूक


चंद्रपूर ब्लॉक ( PG-ONHP(CBM)2022/1) घेण्याची तयारी ONGC तेल कंपनीने इच्छा व्यक्त केली आहे, परंतु २०२३ पर्यंत अजून ह्या ब्लॉकसाठी एकही तेल कंपनीने बोली लावली नाही. नुकतेच पास झालेल्या बिल मध्ये वने-पर्यावरण कायद्यात आता सर्वेक्षण करण्याची परवानगीची अट शिथिल झाली असल्याने पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.


विदर्भातील २ मिथेन साठ्यासाठी २ राउंड चा लिलाव ह्याच वर्षी २०२३ मध्ये झाला होता आणि त्याची मुदत मे २०२३ संपली होती. चंद्रपूर व्यावसाईक ब्लॉक ३३१ स्के/किमी भूभागाचा आहे.आणि ह्यात ३७ बिलियन कुबिक मीटर एवढे साठे आहेत तर सिरोंचा ब्लॉक हा ७०९ स्के/किमी चा असून त्यात ४७ बिलियन क्युबिक मीटर चे साठे आहेत असे उद्योगांच्या बैठकीत म्हटले गेले आहे. विदर्भ इंडस्ट्रीज असोशिएषण ह्यांच्या सोबत ह्या ब्लॉक संदर्भात गेल,लाँयड आणि सोलार ग्रुप ची बैठक आणि सादरीकरण झाले होते. पर्यावरण आणि वन कायद्याच्या अडचणीमुळे अजूनही कुण्या कंपनीने हा ब्लॉक घेतला नसला तरी पुढील संशोधन आणि लिलावा मध्ये हा ब्लॉक घेतला जाण्याची शक्यता अभ्यासक प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)