पोंभुर्णा इको पार्क #PombhurnaEcoPark

Bhairav Diwase
0
पाच वर्षांनंतर आत्ताच का भासली आंदोलनाची गरज?

चंद्रपूर:- जिल्ह्यातील पोभुर्णा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून आदिवासी बांधवांचे आंदोलन चांगलेच गाजत आहे. २४/७ दिवस चाललेल्या या आंदोलनात वृद्धांसोबत बच्चे कंपनीनेही सहभाग घेतला. खरंच काही मागण्यांसाठी हे आंदोलन आहे की, आदिवासींच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कुणावर तरी निशाणा साधला जात आहे, असा प्रश्‍न या आंदोलनाच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पोंभुर्ण्यातील इको पार्कमध्ये असलेला समाजाला झेंडा वनविभागाने काढून फेकला, सोबतच तेथे असलेल्या आदिवासींच्या संस्कृतीची ओळख असलेल्या पुतळ्यांची तोडफोड वनविभागाने केल्याचा आरोप करीत आदिवासींनी आंदोलन पुकारले. राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या क्षेत्रात हे आंदोलन झाले. आदिवासीबहुल, मागास व अतिदुर्गम अशी ओळख असलेल्या पोंभुर्ण्यातील या आंदोलनाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली.

सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर-मूल विधानसभा क्षेत्रातून पहिल्यांदा निवडणूक लढविली, विजयी झाले अन् त्यानंतर युतीची सत्ता आली. मुनगंटीवारांकडे राज्याच्या तिजोरीची चाबी आली. अन् त्यांनी पोंभुर्ण्याचा चेहरामोहराच बदलवला. कधीकाळी दुर्लक्षीत असलेला हा तालुका संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेऊ लागला. पोंभुर्ण्यातील संपन्न असलेल्या वनक्षेत्राला बघण्यासाठी देशविदेशांतील पर्यटक यावे, यासाठी मुनगंटीवारांनी कोट्यवधी रुपयांचा ईको पार्कसाठी उपलब्ध करून दिला.

या ठिकाणी आदिवासीच्या संस्कृतीची ओळख करून देणारे विविध देखावे निर्माण केले गेले. पण बांधकामाच्या नावाखाली वनविभागाने पुतळे फोडले. आदिवासी समाजाचा झेंडा काढून फेकला, असा आरोप करीत पाच महिन्यांपूर्वी आदिवासींनी आंदोलन छेडले होते. त्यानंतर पुन्हा आता आठ दिवसांपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यांच्या अनेक मागण्या मान्य होऊनही आदिवासी बांधव आंदोलनावर ठाम राहिले. याचे कारण भल्याभल्यांना समजले नाही.

आत्ताच आंदोलन का?

राज्यात निवडणुका तोंडावर आल्या आहेत. राज्यातील राजकीय स्थिती प्रचंड गोंधळलेली आहे. अशावेळी पोंभुर्ण्यात आदिवासींकडून झालेले आंदोलन हे राजकीयदृष्टया तर प्रेरित नाही ना? अशी चर्चा जिल्ह्यात आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा जिल्ह्यात आहे. ईको पार्क होऊन पाच वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला. मग आत्ताच आंदोलन का? असाही प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. त्यामुळे राजकीय हेतूने हे आंदोलन प्रेरित असल्याची शंका नाकारता येत नाही.

प्रशासनाचा संयम..

पोभुर्ण्यात आदिवासींच्या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पूर्णवेळ मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. यादरम्यान आंदोलक व प्रशासक आमनेसामनेही आले. आंदोलकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले. यात उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांना दुखापत झाली व त्यांना नागपुरातील रुग्णालयात उपचारासाठी जावे लागले. याप्रकरणी काही आंदोलकावर गुन्हे दाखल झाले आहेत. या संपूर्ण आंदोलनात पोलिसांनी दाखविलेला संयम कौतुकास्पद असल्याचे नागरिक सांगतात.

आंदोलनादरम्यान तोडफोड

आंदोलनादरम्यान तोडफोड व हाणामारी करून आपलेच नुकसान आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून सरकारने साकारलेले इको पार्क तयार करताना काही त्रुटी राहिल्या असतील तर सूचना करून किंबहुना चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो. चर्चेतून मोठ्यात मोठा प्रश्‍न सहज सुटू शकतो, याची अनेक उदाहरणे आहे. पण तरीही आंदोलकांनी आक्रमक होत तोडफोड व हाणामारीचा मार्ग स्वीकारल्याने या आंदोलनाच्या मागे तिसरी शक्ती असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी सोडवले आंदोलन..

दिनांक २३ ऑक्टोबर रात्री राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काही मागण्या मान्य करून, तर काही मागण्या अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन देऊन हे आंदोलन थांबविले. आंदोलन तर थांबले पण आता यानिमीत्ताने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे शोधताना राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)