चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स येथे स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) कार्यशाळा संपन्न #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase


पोंभुर्णा :- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभुर्णा येथे इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळा स्कूल कनेक्ट (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०) या महाराष्ट्र शासनाने निर्देशित सूचनेप्रमाणे घेण्यात आला.

या कार्यशाळेकरिता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स यांची संयोजक म्हणून तालुकास्तरावर निवड केलेली आहे. सदर कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून गोंडवाना विद्यापीठ येथील पदवीत्तर विभागाचे विभाग प्रमुख तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. धनराज पाटील हे होते. तसेच मुख्य प्रशिक्षक म्हणून डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाचे पदव्युत्तर इतिहास विभाग प्रमुख डॉ. मिलिंद भगत हे देखील उपस्थित होते. या कार्यशाळेत चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोम्भूर्णा येथील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. अनंत देशपांडे हे देखील प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.

या कार्यशाळेत केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि त्याचे ठळक वैशिष्ट्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले तसेच शैक्षणिक सत्र २०२४-२५ पासून सुरु होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली. या नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत विद्यार्थ्यांच्या आंतरिक गुणवत्ता व कौशल्यावर आधारित शैक्षणिक अभ्यासक्रमावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

या कार्यशाळेत डॉ. राजीव वेगनवार प्राचार्य चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स , पोम्भूर्णा यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले तसेच अध्यक्ष भाषणात त्यांनी कौशल्यावर आधारित शैक्षणिक धोरणाचे महत्त्व समजून सांगितले. या कार्यशाळेत तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत राबविल्यास जाणारे विद्यार्थी उपयोगी विविध उपक्रमाची माहिती विद्यापीठाचे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉक्टर धनराज पाटील यांनी सविस्तरपणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल सखोल चर्चा करण्यात आली.

या कार्यशाळेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून लाभलेले डॉक्टर मिलिंद भगत यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा अंतर्गत कलागुणांना वाव मिळण्यास कशाप्रकारे उपयुक्त आहे हे समजावून सांगितले. कार्यक्रमाचा शेवट आभार प्रदर्शनाने करण्यात आला. सदर कार्यशाळेला महाविद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.