मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या
पुणे:- मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात भागीदारीत खरेदी केलेली जमीन नावावर करून देण्यास विरोध केल्याने मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून (Pune Police) सुरू आहे.
पंकज कुमार मोती कश्यप असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हत्या करण्यात आलेली व्यक्ती मोहम्मदवाडी येथे एका कन्स्ट्रक्शन साईडवर सुपरवायझर म्हणून काम करत होता. बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगजवळच पंकजचा मृतदेह आढळून आलेला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता पंकजचा मृत्यू बिल्डिंगवरून पडून झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण तपासामध्ये या बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
पंकजला पाचव्या मजल्यावरील बांधकाम सुरू असलेल्या फ्लॅटमध्ये बोलावून त्याच्या शरीरावर धारदार हत्याराने वार करण्यात आले होते. पंकजची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह प्रेशर डकमध्ये टाकून देण्यात आल्याचे आणि रक्ताचे डाग मातीने झाकून ठेवल्याचे पोलिस तपासातून समोर आले. त्यामुळे पंकजचा मृत्यू अपघाती झाला नसून त्याची हत्या झाल्याचे तपासातून उघड झाले. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी तपास पंकज आणि त्याचा नातेवाईक राज उर्फ सुरेश मनीराम आर्या हे दोघे पूर्वी एकत्रित काम करत असल्याचे समोर आले. सोबत काम करत असताना दोघांनी मिळून उत्तरप्रदेशमधील मूळगावी जमीन खरेदी केली होती. हत्या झालेल्या पंकज कुमार कश्यप यांच्या नावावर ती जमीन होती. पंकजने ही जमीन सुरेश आर्या याच्या नावावर करून देण्यास विरोध केला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे सुरेशने भोलानाथ राजाराम आर्या यांच्या मदतीने पंकजची हत्या केली.
Also Read:- तरुणाचं पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं
पोलिसांनी सुरेश मनीराम आर्या आणि भोलानाथ राजाराम आर्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. तांत्रिक आधाराने मुख्य आरोपी उत्तर प्रदेशमध्ये पळून गेल्याचे समोर आले होते. या हत्याप्रकरणी सरेश आणि भोलानाथ या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी पंकजच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांनी दोघांविरोधात गु्न्हा दाखल करत अटक केली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.