धुळे:- नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत असणाऱ्या पाच महिलाकडून प्रत्येकी एक हजार प्रमाणे पाच हजार रुपये लाच घेताना धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकरांना (Chandrakant Baburao Paraskar) धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Dhule ACB Trap) रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.22) एसआरपी कॉलनी, नकाणे रोड, धुळे येथे राहत्या घरी केली. (Bribe Case)
तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 अंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे येथे नर्सिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार व त्यांच्या सोबत इतर पाच महिला नर्सिंग ऑफिसर हे 14 व 15 एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर होते. त्यामुळे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत पारसकर यांनी त्यांच्याकडून गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता. त्यानंतर पारसकर यांनी तक्रारदार यांना बोलावून गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडुन प्रत्येकी एक हजार प्रमाणे पाच हजार रुपये जमा करुन आणून दे, नाहीतर सर्वांची बिनपगारी करेल, असे तक्रारदारांना सांगितले होते. तक्रारदार यांनी कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा केली. मात्र, लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली.
Also Read:- तरुणाचं पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं
एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यावेळी येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे सहायक समादेशक तथा पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत बाबुराव पारसकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. एसीबीच्या पथकाने सापळा रचल्याचे समजताच पारसकर यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिली असता त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात देवपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Also Read:- Crime News: जमिनीचा वाद तरुणाच्या जीवावर बेतला
ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उप अधिक्षक नरेंद्र पवार, लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपाधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली आहे.