चंद्रपूर:- महाराष्ट्र शासनाने सन २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज आणि सवलती जाहीर केल्यानंतर, या यादीत नव्याने समावेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यासाठी हा मोठा दिलासा आहे.
शासनाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, गोंडपिंपरी तालुक्याचा बाधित तालुक्यांच्या यादीत पूर्णतः बाधित तालुका म्हणून समावेश करण्यात आला आहे. हे पत्र चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि नागपूरचे विभागीय आयुक्त यांना माहितीसाठी पाठवण्यात आले आहे.
या निर्णयामुळे गोंडपिंपरी तालुक्यातील बाधितांना विशेष मदत पॅकेजचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक १०/१०/२०२५ च्या शासन निर्णयानुसार करण्यात येत असल्याचेही पत्रात स्पष्ट नमूद केले आहे.


