'या' गोष्टींची घ्या काळजी, वाचा सोपे उपाय
स्मार्टफोन हा लोकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आजकाल फोन करण्यापासून ते ऑनलाईन पेमेंट करण्यापर्यंत सर्व छोट्या-मोठ्या गोष्टींना फोन वापरला जातो. फोनच्या गंभीर समस्यांपैकीच एक म्हणजे फोन ओव्हरहीट होणे.
उन्हाळ्याच्या दिवसांत तर स्मार्टफोन गरम होण्याची समस्या बहुतांश वापरकर्त्यांना त्रास देते. उन्हाळ्यात अत्यंत महागडे फोन सुद्धा गरम होतात. कधी कधी तर गरम झाल्यामुळे फोन चालतही नाहीत. अशा वेळी वापरकर्त्यांनी काही गोष्टींची खुप काळजी घ्यायला हवी. स्मार्टफोनला ओव्हरहीट होण्यापासून वाचवण्यासाठी या गोष्टी करुन पहा.
स्मार्टफोन ओव्हरहीट का होतो?
फोन गरम होण्यासाठी वातावरणाची महत्त्वाची भूमिका असते. सलग खुप वेळ फोन वापरल्याने सुद्धा फोन ओव्हरहीट होतो, परंतु उन्हाळ्याच्या दिवसात ही समस्या जास्त प्रमाणात पाहायला मिळते. अधिक वेळ उन्हात राहिल्याने देखील फोन गरम होतो. कधी-कधी तुम्ही जर चार्जिंगला लावून फोन वापरत असाल, तर तो ओव्हरहीट होऊन फुटूही शकतो.
फोन खिशात ठेवणे टाळा
फोनला जास्त गरम न होऊ देण्यासाठी त्याला खिशात ठेवणं टाळा. कारण जीन्सच्या खिशात आधीच खुप हीट असते, अशात फोन खिशात ठेवला तर तो आणखी गरम होतो, त्यामुळे फोन खिशात ठेवण्याऐवजी बॅगेत ठेवण्याला प्राधान्य द्या.
फोनचा अति वापर टाळा
सतत फोन वापरणे हे फोन ओव्हरहीट होण्यामागचं सर्वात मोठ कारण आहे. फोन स्विच ऑफ करणे हे ओव्हरहिटची समस्या मोठ्या प्रमाणात कमी करेल, त्यामुळे जर फोन गरम झाला, तर त्याला जरा वेळ स्विच ऑफ करुन ठेवा.
सुर्यकिरणांपासून करा बचाव
ज्या ठिकाणी खुप ऊन आहे, किंवा सुर्याची किरणे पडतात अशा ठिकाणी फोन ठेवणे टाळा. तसेच उन्हात गेल्यानंतर फोन वापरणे शक्यतो टाळा. उन्हात फोन वापरल्याने फोनच्या हार्डवेअरवर परिणाम होऊ शकतो.
एयरप्लेन मोड करा सुरु
जर फोन ओव्हरहीट झाला तर फोन वापरणे बंद करा आणि एयरप्लेन मोड सुरु करा. तसेच फोन एखाद्या थंड जागेमध्ये ठेवा. तसेच उन्हाळ्यात अधिक अॅप्लिकेशन्स, गेम्स किंवा इतर सॉफ्टवेअर डाउनलोड करणे टाळायला हवं.
फोन नियमीत अपडेट करा
फोनचे अॅप्स वेळवर अपडेट करत राहा. फोनचे सॉफ्टवेअर सुद्धा नियमीत अपडेट करत राहा, त्यामुळे तुमचा फोन गरम होण्याची समस्या कमी होईल.