चंद्रपूर:- राजसाहेब ठाकरे यांच्या परखड, रोखठोक आणि मराठी माणसासाठी झटणाऱ्या विचारांनी प्रेरित होऊन चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावातील विविध पक्षांतील कार्यकर्ते व गावकऱ्यांनी आज जाहीरपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये पक्ष प्रवेश केला.
मराठी अस्मिता, स्थानिकांना प्राधान्य आणि अन्यायाविरोधातील ठाम भूमिका यामुळे मनसेकडे युवकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून धानोरा गावाने आज त्याचा प्रत्यय दिला. हा पक्ष प्रवेश सोहळा मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी विशेष पुढाकार घेऊन अनुप गौरकार व आकाश हनुमंते यांनी नियोजनबद्ध तयारी करत हा प्रवेश सोहळा यशस्वी केला. याप्रसंगी कॉग्रेस चे ग्रामपंचायत सदस्य विवेक गोगरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश ढाक, माझी ग्रामपंचायत सदस्य आनंद गौरकार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्ये प्रवेश घेतला आहे.
कार्यक्रमात बोलताना मनदिप रोडे यांनी मनसेच्या ठाम आणि रोखठोक भाषेत प्रशासन व स्थानिक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले,
“आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात मोठमोठे उद्योग, कंपन्या, प्रकल्प आहेत. तरीही आपल्या जिल्ह्यातील एकही तरुण-तरुणी बेरोजगार राहू नये, ही आमची भूमिका आहे. पण प्रश्न असा आहे की, इतके उद्योग असताना स्थानिकांना रोजगार का मिळत नाही? यामागे कारण स्पष्ट आहे — स्थानिक लोकप्रतिनिधींचे अपयश आणि भ्रष्टाचार. सरकार, शासन आणि प्रशासनातील काही घटक हे सत्तेच्या मोहात व पैशाच्या जोरावर विकले गेले आहेत. स्थानिकांच्या हक्कासाठी कोणी ठामपणे उभे राहत नाही.
त्यांनी पुढे स्पष्ट इशारा दिला की, “मनसे अन्याय सहन करणार नाही. उद्योगांना स्थानिकांना रोजगार द्यावाच लागेल. परप्रांतीयांचे अतिरेक आणि स्थानिकांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. जर शासन आणि प्रशासनाने डोळेझाक केली, तर मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
यावेळी कार्यक्रमाला पक्षाचे पंकज राजपूत तालुका उपाध्यक्ष, अनुप गौरकार, आकाश हनुमंते,बाळा चंदनवार शहर उपाध्यक्ष, राज शेट्टी,नागेश गौरकार मोरेश्वर जोगी, विनोद मोहवकर, प्रशांत गोगरे, गणेश बोढे, केतन खोकले, सावन गेजिक व मनसे पदाधिकारी सैनिक, युवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना पक्ष संघटन बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले.
धानोरा गावातील हा पक्ष प्रवेश म्हणजे मनसेच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक असून आगामी काळात जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणावर युवक मनसेत प्रवेश करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

