Chandrapur News: हिराई महोत्सवातील अव्यवस्थेचा ठपका; मनपाच्या सहा अधिकाऱ्यांना बजावली नोटीस

Bhairav Diwase
चंद्रपूर:-
हिराई महोत्सवातील स्टेज व्यवस्था आणि राजशिष्टाचाराच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आता प्रशासकीय पातळीवर उमटू लागले . प्रोटोकॉल भंगाच्या आरोपानंतर चंद्रपूर महानगरपालिकेने कठोर भूमिका घेत सहा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.


जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कोहिनूर ग्राउंड येथे प्रथमच हिराई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शासनाकडून विशेष निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, कार्यक्रमादरम्यान स्टेज व्यवस्थेत त्रुटी राहिल्याने राजशिष्टाचाराचे पालन झाले नसल्याचा आरोप समोर आला.या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेतल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने चौकशी करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली.


नोटीस बजावण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बांधकाम विभागातील अभियंते भसारकर, भारती, पवार यांचा समावेश आहे. तसेच शिक्षण विभागातील आत्राम, माहिती व जनसंपर्क विभागातील रैच आणि स्टोअर विभागातील सिद्दिकी यांनाही नोटीस देण्यात आली आहे.स्टेज व्यवस्था, कार्यक्रम नियोजन आणि राजशिष्टाचाराच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटींवरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या घडामोडीनंतर मनपा वर्तुळात खळबळ उडाली असून, प्रशासकीय स्तरावर चर्चाना उधाण आले आहे.