चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात प्रस्तावित मालधक्क्याचा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध दर्शवला असून, ही मागणी जनतेची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मूल शहरात मालधक्का सुरू करण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या असून, याला स्थानिक जनतेने 'ठाम विरोध' दर्शवला आहे. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी २५,००० विद्यार्थ्यांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन येथे मालधक्का सुरू करण्याची विनंती केली होती. मात्र, हे निवेदन आणि त्यावरील सह्या या वाघांच्या समस्येसाठी गोळा करण्यात आल्या होत्या आणि त्याचा वापर मालधक्क्यासाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी पत्रकार परिषदेत केला आहेत.
पर्यावरण आणि आरोग्य: सुरजागड येथील लोहखनिजाची वाहतूक झाल्यास शहरात प्रचंड प्रदूषण वाढेल, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होईल.
अपघातांचा धोका: शहराच्या मध्यभागातून शेकडो हायवा ट्रकची ये-जा सुरू झाल्यास अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.
शिक्षण संस्थांना धोका: प्रस्तावित मालधक्क्यामुळे स्थानिक कर्मवीर महाविद्यालयाचे एकमेव क्रीडा मैदान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
व्यसनाधीनता आणि सुरक्षा: अवजड वाहतुकीमुळे आणि बाहेरील लोकांच्या वावरामुळे शहरात गुन्हेगारी आणि अमली पदार्थांचे प्रमाण वाढण्याची शक्यता महिला वर्गाकडून वर्तवण्यात येत आहे.
केळझरचा पर्याय उपलब्ध असताना हट्ट का?
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने यापूर्वीच मूलचा प्रस्ताव रद्द करून शहरापासून ५ किमी अंतरावर केळझर येथे मालधक्का सुरू करण्यात आला आहे. तिथे रेल्वे मार्गावरून खनिज वाहतूक सुरळीत सुरू असताना, पुन्हा मूल शहरात मालधक्क्याचा आग्रह धरण्यात काय अर्थ आहे? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
नगर परिषदेचा ठाम पवित्रा:
मूल नगर परिषदेने विशेष सभा बोलावून शहरात मालधक्का होऊ नये, असा एकमताने ठराव मंजूर केला आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री स्तरावर ही मागणी पोहोचवण्यात आली आहे.
"मूलवासीयांच्या जीवाशी खेळू नका," असा इशारा देत जनतेने हा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. आता मुख्यमंत्री या दिशाभूल करणाऱ्या निवेदनावर काय कारवाई करतात आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आपली भूमिका कशी मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


