राजुरा:- राजुरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज पाच आदिवासी शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या १५ वर्षांपासून आपल्या हक्काच्या जमिनीसाठी लढा देणाऱ्या या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या उदासिनतेमुळे हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
राजुरा उपविभागांतर्गत येणाऱ्या कोरपना तालुक्यातील कुसुंबी येथील हे पाचही शेतकरी आहेत. मानिकगड सिमेंट म्हणजेच अल्ट्राटेक कंपनीच्या खाणीमध्ये त्यांच्या जमिनी गेल्या आहेत. "एकतर जमिनीचा योग्य मोबदला द्या, नाहीतर आमच्या जमिनी आम्हाला परत करा" ही त्यांची प्रमुख मागणी होती.
यासाठी गेल्या १५ वर्षांपासून हे कोलाम आणि आदिवासी बांधव प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने, संतापलेल्या आणि हताश झालेल्या या पाच शेतकऱ्यांनी थेट राजुरा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या कार्यालयातच विष घेतले.
घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तातडीने धाव घेत पाचही जणांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.


