Chandrapur News: नागरिकांच्या संतापानंतर प्रशासन जागे! जिल्हाधिकारी वसुमना पंत थेट रस्त्यावर

Bhairav Diwase
अपघात रोखण्यासाठी कडक पावले उचलणार
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात सध्या अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये. चंद्रपूर-नागपूर असो वा बल्लारपूर मार्ग, अवजड वाहनांची वर्दळ आता शहरवासीयांच्या जीवावर उठली आहे. काल पुन्हा एकदा एका भीषण अपघातात एका महिलेचा बळी गेला, ज्यानंतर आता जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे.



शहरातील अतिव्यस्त बंगाली कॅम्प चौक काल रक्ताने माखला. रोजच्या प्रमाणे सायकलने मजुरीसाठी जाणाऱ्या एका महिलेला भरधाव मालवाहू ट्रकने चिरडले. या महिलेचा जागीच मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच जनता कॉलेज आणि पोलीस मुख्यालय गेट समोर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा बळी गेला होता. एकापाठोपाठ होणाऱ्या या मृत्यूंमुळे चंद्रपूरकरांमध्ये प्रचंड संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे.


या वाढत्या अपघातांची दखल घेत आज जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्वतः रस्त्यावर उतरले. त्यांनी बंगाली कॅम्प परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित नागरिकांनी आणि महिला व बालकल्याण सभापती संगिता भोयर यांनी प्रशासनासमोर आपल्या व्यथा मांडल्या. अवजड वाहनांची बेशिस्त वाहतूक आणि मुख्य चौकातील अतिक्रमणामुळे हे अपघात होत असल्याचा पाढाच नागरिकांनी वाचला.


परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी घटनास्थळावरूनच कडक सूचना दिल्या आहेत. अपघात प्रवण क्षेत्रात तातडीने स्पीड ब्रेकर आणि डिवायडर बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण तात्काळ हटवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहरांतर्गत अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.