Coal mine: उकणी कोळसा खाणीत मातीचा डोंगर कोसळला; दोन डंपर गाडले, सुदैवाने चालक बचावले

Bhairav Diwase

यवतमाळ:- उकणी खुल्या कोळसा खाणीत गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. खाणीतील मातीचा डोंगर आणि गाळाचा लोंढा अंगावर आल्याने दोन डंपर पूर्णपणे मातीखाली गाडले गेले. मात्र, सुदैवाने चालकांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळला आहे. वणी येथील उकणी कोळसा खाणीत सध्या कोळसा उत्खननाचे काम जोरात सुरू आहे. गुरुवारी नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक खाणीची भिंत सरकली आणि मातीसह गाळयुक्त पाण्याचा प्रचंड लोंढा खाली आला. काही कळायच्या आतच तिथे कार्यरत असलेले दोन डंपर या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.


हे दृश्य इतके भयानक होते की उपस्थित कामगारांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, दोन्ही डंपर चालकांनी जीवाच्या आकांताने वाहनातून बाहेर उड्या घेतल्या आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित स्थळ गाठले. वेकोली प्रशासनाकडून दरवर्षी सुरक्षा सप्ताहावर लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, प्रत्यक्ष खाणीत काम करताना कामगारांच्या सुरक्षेला हरताळ फासला जात असल्याचा आरोप आता कामगार संघटना करत आहेत. पावसाचे साचलेले पाणी आणि ठिसूळ झालेली माती यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.


या घटनेनंतर खाण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या गंभीर दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वेकोली प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.