अंधुक दृष्टी, पण सुरेल आवाजाची जिद्द; गाण्यांतून कुटुंबाचा उदरनिर्वाह

Bhairav Diwase
अंधुक दृष्टी, पण सुरेल आवाजाची जिद्द; गाण्यांतून कुटुंबाचा उदरनिर्वाह


राजुरा:- आयुष्यात अनेक अडचणी असल्या तरी जिद्द आणि कला यांच्या जोरावर माणूस स्वतःचा मार्ग तयार करू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे आंध्रप्रदेशातील ओंगोल  शहरातील लक्ष्मण बोगापुरम. अंधुक दृष्टी असूनही आपल्या सुरेल आवाजाच्या बळावर ते मागील पाच वर्षांपासून विविध शहरांमध्ये फिरत गाणी गाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
     लक्ष्मण बोगापुरम यांच्या परिवारात पत्नी व एक छोटी मुलगी आहे. कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी आपल्या कलेलाच आधार बनवले आहे. एक साउंड बॉक्स आणि माईकच्या सहाय्याने ते विविध शहरांतील चौक, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी गाणी सादर करतात. त्यांच्या गाण्यांकडे नागरिकांचे सहज लक्ष वेधले जाते. आवाजातील माधुर्य आणि भावपूर्ण सादरीकरणामुळे अनेकजण त्यांचे गाणे ऐकण्यासाठी थांबतात.
     विशेष म्हणजे लक्ष्मण यांची दृष्टी अत्यंत कमी आहे. त्यांना नीट दिसत नसतानाही त्यांनी परिस्थितीसमोर हार मानलेली नाही. आपल्या कलेच्या माध्यमातून ते संघर्षमय जीवन जगत असून लोकांकडून मिळणाऱ्या मदतीवर आणि गाण्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
    आत्तापर्यंत त्यांनी नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर यांसह अनेक शहरांमध्ये जाऊन आपल्या कलेचे प्रदर्शन केले आहे. सध्या ते राजुरा येथे साई लॉजमध्ये दररोज ७०० रुपये भाड्याने राहत असून शहरातील रस्ते व चौकांमध्ये गाणी गाऊन उदरनिर्वाहासाठी पैसे कमावत आहेत.
   लक्ष्मण बोगापुरम यांचा संघर्ष आणि कला पाहून अनेक नागरिक भावूक होत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर जगण्याची त्यांची धडपड अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Tags