Chandrapur News: नक्षली हिडमाच्या गाण्यावर डान्स करणे पडणार महागात; ५४ व्हिडिओ हटवले, पोलीस ॲक्शन मोडमध्ये

Bhairav Diwase
चंद्रपूर:- गडचिरोलीत नक्षलवादी हिडमाच्या गाण्यावर डान्स करणाऱ्या युवकांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता पोलीस प्रशासन अधिक आक्रमक झाले आहे. नागपूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत, नक्षलवाद्यांचे गौरवीकरण करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.

चंद्रपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना संदीप पाटील म्हणाले की, नक्षली नेता हिडमा हा सीपीआय माओवादी संघटनेचा केंद्रीय समिती सदस्य आहे. २००९ पासून या संघटनेवर ‘युएपीए’ (UAPA) अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही बंदी घातलेल्या संघटनेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रचार करणे किंवा त्याचे उदात्तीकरण करणे हा कायदेशीररीत्या गंभीर गुन्हा आहे.


सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कंटेंटवर एसआयडी, एनआयए आणि आयबीसह विविध यंत्रणा लक्ष ठेवून असून आतापर्यंत हिडमाशी संबंधित ५४ व्हिडिओ हटविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.


विशेष पोलीस महानिरीक्षकांनी स्पष्ट केले आहे की, केवळ डान्स करणे हा उद्देश नसून, त्यामागे बंदी असलेल्या विचारधारेचा प्रचार होत आहे का, हे तपासले जात आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर सायबर सेल आणि गुप्तचर यंत्रणांचे बारीक लक्ष असून, आतापर्यंत हिडमाच्या गौरवाशी संबंधित ५४ व्हिडिओ हटवण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नक्षली समर्थकांचे धाबे दणाणले असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल आता अधिक सतर्क झाले आहे.