चंद्रपूर:- चंद्रपूर येथील वडगाव परिसरातल्या हॉटेल रिलॉक्स येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी आरोपी पिता, पुत्राविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, सावजी पांडुरंग हस्तक (74), प्रदीप सावजी हस्तक (30, रा. वडगाव, चंद्रपूर) अशी आरोपींची नावे आहेत. येथील वडगाव परिसरातील 'रिलॉक्स' हॉटेल' येथे सावजी हस्तक व प्रदीप हस्तक हे दोघे पिता-पुत्र दोन ते तीन महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने बनावट गिर्हाईक पाठवून महिला पंच, सामाजिक कार्यकर्ते व अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाच्या चमूसह हॉटेलवर धाड टाकली. यावेळी आरोपी पांडुरंग हस्तक व प्रदीप हस्तक हे दोन पीडित महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीकडून भ्रमणध्वनी, रोख रक्कम, कंडोम बॉक्स, रजिस्टर, क्युआर कोड असा एकूण 7 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी पांडूरंग हस्तक यास ताब्यात घेण्यात आले असून, दुसरा आरोपी प्रदिप हस्तक फरार आहे. आरोपींविरूध्द रामनगर पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3, 4, 5, 7 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलिस उप निरीक्षक संतोष निंभोरकर व सुनील गौरकार, सहायक फौजदार धनराज करकाडे आदींनी केली.


