मुंबई:- देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक मोठी माहिती समोर आली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने थेट लातूरमधील नामांकित RCC कोचिंग क्लासचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात आणि वैद्यकीय प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
लातूर हे वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीसाठी लातूर पॅटर्न म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाते. याच लातूरमधील पेपरफुटीच्या धाग्यादोऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीबीआयचे तब्बल 28 अधिकाऱ्यांचे जंगी पथक दाखल झालं होतं. या पथकाने शिवराज मोटेगावकर यांची तब्बल 8 ते 10 तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि संशयास्पद बाबी आढळल्याने अखेर सीबीआयने मोटेगावकरांना ताब्यात घेतलं.
मोटेगावकर यांचं नाव सीबीआयच्या रडारवर कसं आलं, याचाही एक मोठा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून पी. व्ही. कुलकर्णी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. कुलकर्णी यांच्या कसून केलेल्या चौकशीतूनच शिवराज मोटेगावकर यांचं नाव समोर आलं होतं. त्यानुसार सीबीआयने लातूरमध्ये ही मोठी चक्रं फिरवली अन् त्यांची चौकशी केली. त्यानंतर आता त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
लातूरमधील पेपरफुटीच्या चौकशीसाठी आलेल्या CBI च्या 28 जणांच्या पथकाने त्यांची तब्बल 8 ते 10 तास दीर्घ चौकशी केली होती. या खळबळजनक कारवाईनंतर आता CBI चे टीम मोटेगावकरला दिल्ली कोर्टात हजर करणार आहे. शिवराज मोटेगावकर यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले असून एका पालकाने केलेल्या तक्रारीवरून हा मुख्य तपास सुरू होता.


