Chandrapur News: ताडोबा बफर क्षेत्रात शेतकऱ्याचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

Bhairav Diwase
चोरगाव परिसरातील नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास!
चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात दहशत माजवणारा वाघ अखेर जेरबंद झाला आहे. मामला वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चोरगाव परिसरात काही दिवसांपूर्वी या वाघाने एका शेतकऱ्याचा बळी घेतला होता. तेव्हापासून या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण होते. अखेर वन विभागाने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने कारवाई करत या वाघाला जेरबंद केले आहे.


वाघ पकडण्याची रीतसर परवानगी मिळाल्यानंतर वन विभागाने चोरगावच्या जंगलात मोहीम आखली. वाघाला आकर्षित करण्यासाठी आधी एक आमिष बांधण्यात आले होते. वाघाने त्याची शिकार केली, पण ती जंगलात ओढून नेली. वन विभागाने हार न मानता अत्यंत मजबूत पद्धतीने दुसरे आमिष बांधले. वाघ पुन्हा तिथे येताच, ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शूटर अजय मराठे यांनी अचूक निशाणा साधत डार्ट गनद्वारे वाघाला भूल दिली.


सुमारे दोन वर्षांचा हा वाघ बेशुद्ध झाल्यानंतर त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात हलवण्यात आले. प्राथमिक वैद्यकीय तपासणीत वाघाची प्रकृती उत्तम असल्याचे समोर आले असून, त्याला पुढील देखरेखीसाठी ताडोबा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर म्हणजेच 'टीटीसी' येथे हलविण्यात आले आहे. वाघ पकडल्या गेल्याने चोरगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.