Chess : चंद्रपुरात पहिल्यांदाच रंगणार बुद्धीचा थरार!

Bhairav Diwase
अंडर-11 महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ निवड स्पर्धेला उत्साहात सुरुवात!
चंद्रपूर:- चंद्रपुरात पहिल्यांदाच 'अंडर-11 महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ निवड स्पर्धे'चा शड्डू ठोकला गेलाय. आजपासून म्हणजेच १० जुलै ते १२ जुलै दरम्यान चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयात या भव्य स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आज या स्पर्धेचा अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार सोहळा पार पडला.


चंद्रपूरच्या क्रीडा इतिहासात आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल. महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने क्रिएटिव्ह चेस असोसिएशन, जनता महाविद्यालय, ड्रीम्स स्पोर्टिंग क्लब आणि जी. एस. रायसोनी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्रातील तब्बल ३० जिल्ह्यांमधून शेकडो उदयोन्मुख बाल बुद्धिबळपटू, त्यांचे प्रशिक्षक आणि पालक चंद्रपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या संपूर्ण क्रीडा संकुल बुद्धिबळमय वातावरणाने गजबजून गेले आहे.


या स्पर्धेचे उद्घाटन चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा. अशोक जिवतोडे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बलराम दोडाणी, ड्रीम चंद्रपूरचे सचिव अनिल ठाकरे, गडचिरोली चेस असोसिएशनचे अध्यक्ष सतीश त्रिनगरीवार, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुन्डे आणि जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महाताले यांची प्रमुख उपस्थिती होती.


ही केवळ एक स्पर्धा नसून, राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचे खेळाडूंचे स्वप्न आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बाल खेळाडूंना थेट राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक पटावरचा डाव अत्यंत चुरशीचा आणि रोमांचक ठरणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या म्हणजेच FIDE च्या कडक नियमांनुसार खेळवली जात आहे. स्पर्धेत पारदर्शकता आणि शिस्त राहावी यासाठी प्रवीण ठाकरे, सागर साखरे, दीपक चव्हाण, संजय पाटील आणि नरेंद्र कन्नाके हे अनुभवी पंच म्हणून काम पाहत आहेत.
क्रिएटिव्ह चेस असोसिएशनचे अध्यक्ष अश्विन मुसळे, ड्रीम्सचे अध्यक्ष प्रेमराज गावंडे आणि डॉ. अशोक जिवतोडे यांच्या विशेष पुढाकारातून या तीन दिवसीय स्पर्धेचे चोख नियोजन करण्यात आले आहे. आगामी दोन दिवसांत येथे बुद्धिबळाचे अत्यंत दर्जेदार सामने पाहायला मिळतील आणि म्हणूनच आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष चंद्रपूरकडे लागले आहे.