चंद्रपूर:- आगामी सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ शांततेत, सुरक्षित आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सज्ज झाले आहे. आज सायंकाळी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेडमध्ये एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त अकनूरी नरेश, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि जिल्ह्यातील सुमारे २५० गणेश मंडळांचे प्रतिनिधी, मूर्तिकार व डीजे चालक उपस्थित होते.
गणेशोत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यासाठी पोलीस अधीक्षक व उपस्थित अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना खालीलप्रमाणे महत्त्वपूर्ण सूचना दिल्याः
समन्वय व सुरक्षा व्यवस्थाः सर्व गणेश मंडळांनी आपापल्या पातळीवर समन्वय समिती स्थापन करावी, स्वयंसेवकांची नियुक्ती करावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने मंडप परिसरात सीसीटीव्ही (CCTV) व्यवस्था उभारावी.
बालकांची सुरक्षाः विसर्जन मिरवणुकीतील वाहनांवर लहान मुलांना बसवू नये, जेणेकरून संभाव्य अपघात टाळता येतील.
पारंपरिक वाद्यांना प्राधान्यः यंदाच्या महोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर वाढवून संस्कृतीचे जतन करण्याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
आदर्श गणेश मंडळ स्पर्धाः जिल्ह्यातील सर्व मंडळांनी प्रशासनातर्फे आयोजित 'आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत' उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.
आवाहनः जिल्ह्यात 'डीजे' बंदीची प्रभावी अंमलबजावणी :
चंद्रपूर जिल्ह्यात श्री गणेश चतुर्थीपासून 'डीजे' (DJ) वाजवण्यावर पूर्णपणे बंदी असणार आहे. सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करण्यासाठी या बंदीची अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले असून सर्व चालक-मालक व मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन व चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सवासाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात येणार आहे. नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे व सूचनांचे तंतोतंत पालन करून आगामी उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करावा, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

