No-fly zone: नो फ्लाइंग झोनमध्ये विनापरवानगी ड्रोन उडवणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल!

Bhairav Diwase

गडचिरोली:- चामोर्शी तालुक्यातील मुधोली चेक पोस्ट परिसरात नो फ्लाइंग झोनमध्ये परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी आष्टी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेदरम्यान काही नागरिकांनी तिघांना डांबून ठेवले होते, या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने केले आहे.


दि. ९ जुलै रोजी दुपारी ड्रोन उडविल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता संबंधितांकडे परवानगी नसल्याचे आढळले. शिवम कळोळे, सचिन विश्वकर्मा आणि प्रवीण पोटेवार यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९३/२०२६ नोंदविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी दिली आहे.


तसेच याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले की, चामोर्शी परिसरात भूमी संपादनाला दोन महिन्यांसाठी स्थगिती असून, सध्या त्या संदर्भात कोणतीही प्रशासकीय कारवाई सुरू नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास ठेवू नये आणि कायदा व सुरक्षा व्यवस्थेची पायमल्ली करू नये. कायदा व सुव्यवस्था राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, कायदा हातात घेण्याचा किंवा शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्धही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.