Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा पुन्हा धुमाकूळ; वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार!

Bhairav Diwase


चिमूर:- चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा पेटला असून, वाघाच्या हल्ल्यात एका ५० वर्षीय शेतकरीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण चिमूर तालुक्यात प्रचंड घबराट आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


ही धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात घडली आहे. खडसंगी बफर झोन अंतर्गत येणाऱ्या बरडघाट परिसरात शेताच्या संरक्षणासाठी कुंपणाचे साहित्य आणण्यासाठी गेलेल्या राजेंद्र तिमाजी भोयर यांच्यावर वाघाने दबा धरून अचानक हल्ला केला. ५० वर्षीय राजेंद्र भोयर हे काही समजण्याच्या आतच वाघाने त्यांना जागीच ठार केले.


राजेंद्र भोयर हे शेतात काम करण्यासाठी गेले होते, मात्र वाघाच्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे जंगलाला लागून शेती करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.