Top News

१ जुलै ... राष्ट्रीय डॉक्टर दिवस....

                  विशेष लेख.

                          ✒️लेखक🖋️
   डॉ. खेमराज हरिश्चंद्र मडावी (एम. बी. बी. एस)
        ( वैद्यकीय अधिकारी , जि. प. चंद्रपूर)

      
    जिल्ह्याच्या अगदी टोकावर असणारे आदिवासीबहुल, जंगलव्याप्त, नक्षलग्रस्त अतिदुर्गम भाग म्हणून सावली हे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत तालुक्याचे ठिकाण. तालुका मुख्यालयापासून २०- २२ कि. मी. अंतरावर घनदाट मखमली हिरवकंच शालू पांघरलेल्या निसर्गाच्या सानिध्यात असणारे हिंस्त्र प्राण्यांनी जंगलव्याप्त पाथरी हे ठिकाण. त्या ठिकाणी असणाऱ्या परिसरातील गावांना संजीवनी म्हणून वरदान असणारे आरोग्य वर्धिनी केंद्र आणि त्यातून येणारा नित्य कामाचा अनुभव काही अलौकीकच आहे. परंतु प्रत्यक्षात आदिवासीबहुल क्षेत्र म्हणा किव्हा अतिदुर्गम भाग म्हणा याबद्दल गैरसमजूतपणा पुढे येऊन मोठ्याने गाजावाजा करून एक भितीमय वातावरण तयार केले जात आहे. वास्तविक  तसं काही नसून या आनंददायी रम्य ठिकाणाबद्दल पेरलेली पोकळ बीजे आहे. दंत कथा आहे. या ठिकाणी काम करणे इतकं आनंददायी आहे जसं अथांग समुद्रात जलतरण स्पर्धा असावी आणि ती सहज पार करून जिंकवी तसे यामानाने शहरी भागात मुळातच बोलायचं झालं तर आरोग्या संदर्भातल्या भीषण समस्या किव्हा त्यातील आव्हाने आणि त्यावर करण्यात येणारी उपाययोजना हे खरोखरचं  आव्हानात्मक आहे .
      
               २०- २२ गावांचा येणारा संपर्क, या सर्वांचे केंद्रस्थान असलेले गावपरिसरातील पाथरी हे ठिकाण. त्या अनुषंगाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंबहुना समाजपयोगी जनतेचे हित जोपासून काम करतांना आपल्याला निश्चितच अतिशय आनंद झाला. शहरी भागाबद्दल बोलायचे झाल्यास ही शहरे सर्व सोयी सुविधेने परिपूर्ण असतात. त्यामुळे अशा ठिकाणी शहराचा अजेंडा घेऊ पाहणाऱ्या एम.बी.बी.एस. (MBBS) डॉक्टर्सना काम करायला आवडते. त्याचे ग्रामीण भागाशी काही सोयरसुतक आहे की नाही हे माझ्या आकलनापलिकडे आहे. त्यामुळे याचे स्पष्टीकरण करणे हे न उलगडणाऱ्या कोड्याप्रमाणे आहे. अशा ग्रामीण भागातील प्रेमळ जनतेला आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांना पुरविणे, आरोग्याच्या संबंधी योग्य मार्गदर्शन करणे, त्यामुळे अशा भूमिकेचा अंगिकार करून आरोग्याशी संबंधित नागरिकाला जागृत करून त्यांना लाभ होत असेल तर निश्चितच आपल्याला आनंद होईल.
 
                   मार्च २०१८ ला अचानक आदेश येऊन धडकला. जायचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सुरुवातीला जाणीवपूर्वक काही अडचणी आल्या पण त्यावर आपण निश्चितच न डळमळता, न अडखळता, खंबीरपणे मनाशी ठाम घेतलेल्या सेवाव्रतामुळे मात केली. भाग जरी अतिसंवेदनशील आणि आतील असला तरी येथील जनता नेहमी चांगल्याला चांगलं म्हणणारी, बहुगुणी, प्रेमळ, माया लावणारी, सदाचारी, सहकार्य करणारी परिस्थितीने गरीब पण मनाने खूप श्रीमंत आहे. त्यामुळे घेतलेले सेवाव्रत हाती घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे व त्यांची आरोग्याच्या बाबतीत असलेली गैरसमजूत दूर करून समजूत काढणे यापेक्षा द्विगुणित आनंद दुसरा नाही. 

                साधारणतः शासनाचे विविध आरोग्याशी संबंधित कार्यक्रम म्हणा किव्हा योजना म्हणा यांची पुरेपूर आणि भक्कम माहिती देऊन अवगत करणे. जरी येथील भोळीभाबळी जनता परिस्थितीने हतबल लाचार असली तरी त्यांच्यातील माणसातील माणुसकीचे घडणारे दर्शन आजतागायत अजूनही अखंड ज्योतिप्रमाणे जिवंत आहे. त्यांच्यातील माणसातील माणुसकी आणि अठराविश्व दारिद्र्य असलेल्या आर्थिक बाबींचा विचार केला तर आपण कायम खंबीर आणि तत्पर त्यांच्या सेवेत राहू यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे जेवढा प्रेम तुम्हाला व्यस्त जीवनशैलीच्या शहरी भागात मिळणार त्याहून अधिक आणि भरभरून अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम ग्रामीण भागात मिळेल. हे मी ठाम राहून खंबीरपणे सांगू शकतो. म्हणून यासाठी अशा दुर्गम भागात आरोग्य आणि शिक्षण या दोन मूलभूत हक्काची  रास्त आणि कळकळीची पूर्तता होणे अपेक्षित आहे.

                 अशा भागात आवश्यक सोय सुविधा नसल्या तरी माणसाची काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती तितकीच तीव्र असली की, सगळं काही सोयीस्कर होते. आरोग्य संदर्भात आपल्याला आलेला अनुभव, भौगोलिक परिस्थिती, जनतेशी साधलेला संवाद, व्यक्त करतांना असे समजते की, माणसे ही फक्त माणसे असतात. त्यात शहरी व ग्रामीण हा मतभेद नसतो. माणसातील माणुसकी आणि त्या माणुसकीतील मानवतेची सेवा हा गुण अंगिकारून जर तुम्ही काम केलंत तर यापेक्षा दुसरा आनंद गगणात मावणार नाही. एक अधिकारी म्हणून या ठिकाणी काम केल्याचा अनुभव हा शहरी भागात येणार नाही. हे मी निश्चितच सांगू शकतो. यात काही वावगे नाही. 


                 🖋️ लेखक✒️
   डॉ. खेमराज हरिश्चंद्र मडावी (एम. बी. बी. एस)          ( वैद्यकीय अधिकारी , जि. प. चंद्रपूर )

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम, पाथरी सावली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने