Top News

धडपडणाऱ्या अनेक हातांची कोवीड लढ्याला साथ!

जिल्हा आरोग्य यंत्रणेतील अविरत काम करणारे अधिकारी-कर्मचारी.
Bhairav Diwase. July 21,2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- गेल्या तीन ते चार महिन्यांत सामान्य माणसांपासून तर प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचा विविध आघाड्यांवर कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी लढा सुरू आहे. हा लढा पुढेही सुरू राहणार आहे. या लढ्यामध्ये अनेक योद्ध्यांची नावे आहेत जे निमूटपणे आपलं काम लोकहितासाठी 12 ते 14 तास दररोज व नियमित करीत आहे. समाजाच्या भल्यासाठी जिल्हा प्रशासनाची रात्रंदिवस धडपड सुरू आहे.अशी धडपड सुरू असणाऱ्या जिल्हा नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या कार्याला आमचा सलाम..!

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यात लाॅकडाऊन सुरू झाले आहे. चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात कोरोना विरुध्द लढण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे. जिल्हा कोरोना नियंत्रण कक्ष, जिल्हा कोरोना अलगीकरण (कॉरन्टाईन) पथक, जिल्हा कोरोना अहवाल व नोंदवह्या पथक, कोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाही कृतीदल, संपर्क संवाद व आकस्मिक उपाययोजना व मदत पथक, प्रशासकीय नियंत्रण पथक, जिल्हा सर्व्हेक्षण पथक अशा प्रकारची विविध पथके तयार करुन चंद्रपूर जिल्हा प्रशासन कोरोना विषाणुशी लढण्यासाठी सज्ज आहे.

जिल्हयात कोरोना नियंत्रणासंदर्भात जिल्हा कोरोना नियंत्रण कक्ष अवैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. या पथकामार्फत कोरोना नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील संस्थात्मक व गृह अलगीकरण कक्षाची दैनंदिन माहिती एकत्रित करून जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे, अलगीकरणासाठी स्वतंत्र इमारतीची व्यवस्था करणे, वंदे भारत मिशन अंतर्गत, कोवीड क्वाॅरन्टाईन अलर्ट सिस्टिमची माहिती राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठविणे, नगरपालिका, नगरपंचायत,ग्रामपंचायत, पंचायत समिती यांचेकडून गृह व संस्थात्मक अलगीकरणाची माहिती घेणे व पाठपुरावा करण्याचे कार्य या पथकामार्फत होत असते. त्याची जबाबदारी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, समाजकल्याण अधिकारी सुनील जाधव,उपायुक्त महानगरपालिका गजानन बोकाडे, नोडल अधिकारी डॉ.राहूल भोंगळे यांचेवर सोपविलेली आहे व त्यांना सहाय्यक म्हणून प्रणव बक्षी, धनंजय पाल, मनीष पेंढारकर, सुनील चिकटे कार्य करीत आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संपूर्ण वैद्यकिय व्यवस्थापन, महत्वाच्या सूचना व माहितीची देवाणघेवाण,सनियंत्रण व पर्यवेक्षणाची जबाबदारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत उत्कृष्टरित्या पार पाडित आहेत.

सर्व तालुक्यातील तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी, मुख्याधिकारी, नगरपरिषद-नगरपंचायत, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय यांच्याशी संपर्क ठेवून जिल्हास्तरावरून माहितीचे देवाण-घेवाण व समन्वय राखण्याची जबाबदारी तसेच चेक पोस्ट वरून आलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करून अहवाल सादर करणे हे जबाबदारीचे कार्य जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अनिल कुकडपवार सातत्याने पार पाडत आहेत.

कोवीड-19 संदर्भातील सर्व माहिती व कागदपत्रे हाताळणे, माहितीची देवाण-घेवाण, तसेच कंटेनमेंट प्लॅनची माहिती मंत्रालय, मुंबई येथे पाठविणे. चंद्रपूर शहरात चेक पोस्ट मधून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण करून अहवाल सादर करणे व आयुष मंत्रालयाद्वारे निर्गमित तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी गठीत केलेल्या आयुष समितीमार्फत नागरिकांना आयुष औषधोपचार पद्धतीचा प्रचार- प्रसार करण्याचे कार्य करणे,अँटीजेन टेस्टिंग सेंटर संलग्नित कामाची तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करणे व समन्वय साधण्याचे कार्य वैद्यकीय अधिकारी, डॉ.अकिल कुरेशी दैनंदिन करीत असतात.

जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व प्राथमिक आरोग्य केंद्राशी समन्वय साधून आय.एल.आय व सारी या रुग्णांचे अहवाल तयार करणे. आवश्यक सर्वेक्षण व कार्यवाही बाबत खात्री करणे, इमर्जी हॉटस्पॉट सर्वेचा अहवाल तयार करणे, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका,ए.एन.एम. यांना कोवीड संदर्भात प्रशिक्षण देण्याचे कार्य तसेच कमुनिकेशन, इमरजंसी, आणि सपोर्टींग स्कॉड तयार केलेले असुन त्याचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या डॉ. प्रिती राजगोपाल सक्षमपणे काम सांभाळीत आहे.

अॅटींजेन टेस्टिंग सेंटरची माहिती गोळा करणे, सेफ्टी फर्स्ट ॲपच्या माध्यमातून समन्वय साधणे, रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास कंटेनमेंट झोनचे मॅपिंग करण्याचे कार्य कोरोना नियंत्रण कक्षातील एच.डब्ल्यू.सी.कन्सल्टंट डॉ. पराग जीवतोडे उत्कृष्टरित्या करीत आहे.

जिल्ह्यात आयुष योजना व कोरोनाविषाणू आजारा संबंधित संपूर्ण प्रचार व प्रसिद्धी साहित्य तयार करण्याचे कार्य फ्लोरोसिस कन्सल्टंट डॉ.ईश्वर राठोड यांच्या मार्गदर्शनात आर्टिस्ट सुभाष सोरते पार पडत असतात.

कंट्रोल रूमला आलेल्या कॉलचा पाठपुरावा करणे, फोन आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान झाले का ? याची खात्री करणे, समाधान न झाल्यास संबंधित अधिकारी यांचेशी संपर्क साधून तक्रार निवारण करणे, नागरिकांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करणे तसेच सगळ्यां कॉलचा पाठपुरावा करून यादी तयार करून अहवाल सादर करण्याचे कार्य तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी मेश्राम पार पाडीत आहे.

त्यासोबतच कोरोना नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित राहण्याकरिता सनियंत्रण करणे, जिल्हा व जिल्हा बाहेरून नागरिकांचे येणारे फोनवर संवाद साधून त्यांना आवश्यक ते योग्य मार्गदर्शन व आलेल्या फोनचा लेखी रेकॉर्ड तयार करून वरिष्ठांना दैनंदिन अहवाल सादर करणे. तसेच नियंत्रण कक्षात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक तयार करून ते कार्यान्वित करणे. यामध्ये हिवताप विभाग, हत्तीरोग विभाग, कुष्ठरोग विभाग, क्षयरोग विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग येथील सर्व कर्मचारी सेवा देत असतात त्यांचे नियोजन करण्याचे कार्य साथरोग अधिकारी डॉ.मीना मडावी करीत असतात.

कोवीड विषाणूच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तपासणी नाक्याचे संपूर्ण नियोजन करणे तसेच कंटेनमेंट झोन तयार करून कार्यान्वित करण्याचे कार्य महानगरपालिका उपायुक्त गजानन बोकाडे व सहाय्यक आयुक्त अरुण सरनाईक, विद्या पाटील पार पाडीत असतात.

आयसोलेशन यादी अद्ययावत करून रिपोर्ट तयार करणे, व आरटीपीसीआरचा दैनंदिन अहवाल तयार करण्याचे कार्य साथरोग तज्ञ डॉ. सचिन भगत पार पाडतात.

जिल्ह्यातील कोरोना आजार संदर्भातील माहिती संकलित करणे, मॉनिटरिंग करणे, आरोग्य विभागाला वेळोवेळी माहिती उपलब्ध करून देणे, ग्रामीण भागातील अलगीकरण अहवाल बघणे, दंडाची केलेली कारवाई किती ? याबाबतची माहिती संकलन करण्याचे कार्य नोडल ऑफिसर (सेफ्टी फर्स्ट ॲप) सुनील चिकटे करीत असतात.

संस्थात्मक अलगीकरण अहवाल तयार करणे, आयसोलेशन कक्षातील रुग्णांचा पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अहवाल तयार करणे तसेच संस्थात्मक अलगीकरण कक्षाला भेट देण्याचे कार्य आरोग्य सहाय्यक, नितीन झोडे करीत असतात.

शहरात दररोज दाखल होणाऱ्या परजिल्ह्यातील व परराज्यातील व्यक्तींची यादी तयार करण्याचे कार्य तसेच आय.एल.आय व सारीच्या रुग्णांचा दैनंदिन व साप्ताहिक अहवाल तयार करण्याचे कार्य जिल्हा आशा समन्वयक शितल राजापुरे करीत असतात. तसेच कोवीड विषाणू संदर्भातील दैनंदिन अहवाल तयार करण्याचे कार्य आरोग्य सहाय्यक ,प्रेमचंद वाकडे करीत आहे.

पॉझिटिव्ह अहवाल तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे कार्य महानगरपालिकेच्या पि.एच.एन.ज्योती व्यवहारे पार पाडीत असतात. तसेच कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात सहाय्य करण्याचे कार्य आशा तालुका फॅसीलेटर, विद्या येनुरकर,सचिन महाडोळे करीत असतात.

या नियंत्रण कक्षातील सर्व माहिती अद्ययावत करण्याचे तसेच सर्व दैनंदिन माहिती संगणकामध्ये गोळा करून ठेवण्याचे कार्य डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रियंका बुरूले, सपना लखदिवे, श्वेता अल्लीवार, धनश्री जंगीटवार, रसिका उरकुडे, राकेश नाकाडे, सबाहत खान, जयप्रकाश सोना, प्रकाश मोहुरले व अनिल मालोजवार दैनंदिनरीत्या करीत असतात.

कोरोना संकटाच्या काळात वाहन चालक यशवंत मडावी, विजय बोंडे, राजेश दिकोंडवार, ताराचंद भोयर, मकसूद पठाण आपली सेवा बजावत आहे. परिचर श्री. गेडाम, मंगेश वाघाडे व इतर कर्मचारी तसेच सफाई कर्मचारी,सहायक, या सर्वानीच जोखीम पत्करून आपले दैनंदिन कार्य उत्तम सेवा देण्यास सदैव तत्पर असतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने