जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या ब्रम्हपुरी येथे आढावा बैठक.
Bhairav Diwase. Aug 27, 2020
ब्रम्हपुरी:- कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातून कोरोना हद्दपार करण्यासाठी व नागरीकाच्या चांगल्या आरोग्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी आपली जबाबदारी, कर्तव्य व्यवस्थित पार पाडून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी उचित उपाययोजना कराव्यात व वेळोवेळी शासन निर्देशांचे पालन करण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन व सूचना करून कोरोना या आजारावर मात करण्यासाठी परिश्रम घ्यावे असे निर्देश यावेळी खासदार अशोक नेते यांनी दिले.
ब्रम्हपुरी विश्रामगृह येथे आज दि 27 आगस्ट रोजी आयोजित कोविड -19 आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात सर्वप्रथम कोरोणाबाधिताची नोंद ब्रम्हपुरी येथून झाली आणि त्यापाठोपाठ कोरोणा बाधितांची संख्या दिवसेंदिवस तालुक्यात वाढती आहे. अशा कोरोणाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ब्रम्हपुरी शहरात कोरोणा विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर हे संक्रमण कमी करण्यासाठी तालुक्यात स्थानिक प्रशासनाच्यावतीने काय खबरदारी घेण्यात येत आहे, यासोबतच शासनाने घालून दिलेल्या विविध नियमांचे जनतेकडून पालन करवुन घेण्यासाठी काय उपाययोजना राबविल्या जात आहेत. या बाबींचा संयुक्त आढावा चिमूर - गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री. अशोक नेते व चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी आज घेतला.
यावेळी, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा सदस्य क्रिष्णाभाऊ सहारे, पं. स. सभापती रामलाल दोणाडकर, उपसभापती सौ. सुनीता ठवकर, माजी सभापती सौ. प्रणाली मैंद, उपविभागीय अधिकारी प्रकाश अंबादे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे, तहसिलदार विजय पवार, पं स सदस्या ऊर्मिलाताई धोटे, पं स सदस्या कुंभारे, पं स सदस्य निळकंठ मानापुरे संवर्ग विकास अधिकारी प्रणाली खोचरे ,
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किल्लारे, पोलीस निरीक्षक स्वप्निल खाडे, नगरसेवक मनोज वठे आदींसह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.