Top News

डी.एड.शिक्षक महासंघाचे ८ जूनला आंदोलन.

४० वर्षांपासून शिक्षकांवर अन्याय.

एक वर्ष उलटुनही अधिसुचनेची अंमलबजावणी नाही.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- दि.८ जून २०२० च्या अधिसुचनेची एक वर्ष उलटुनही अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र माध्यमिक डी.एड.महासंघातर्फे येत्या ८ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्याचा इशारा महासंघाच्या अध्यक्षा पदमा तायडे यांनी दिला असल्याचे महासंघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देविदास जांभुळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जांभुळे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र खाजगी शाळा (कर्मचारी सेवेच्या शर्ती) १९८१ नुसार शालेय प्रशासन चालत असून गेल्या ४० वर्षांपासून खाजगी माध्यमिक शाळांतील डी.एड.शिक्षकांना मिळत असलेल्या दुय्यम वागणुकीमुळे केंद्रिय कार्यकारिणीची दूरदृश्य प्रणालीद्वारे २० मे रोजी पदमा तायडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये सर्वानुमते आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीमध्ये महासंघाचे मार्गदर्शक संजय देशमुख आणि दिनेश कुटे उपस्थित होते.बैठकीत शासनाच्या वेळकाढुपणाचा निषेध करुन अधिसुचनेची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय तायडे यांनी जाहिर केला.


महासंघाचे महासचिव बाबा आगलावे यांनी महासंघाच्या कार्याचा आढावा सांगून पदवीधर डी.एड.शिक्षकावर होत असलेल्या अन्यायाबाबत नाराजी व्यक्त केली. तर कार्याध्यक्ष नंदकिशोर गायकवाड यांनी शासनाने ८ जून २०२० रोजी अधिसूचना प्रसारित करुन प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांच्या ‌आशा पल्लवित केल्या. परंतू वर्ष लोटुनसुद्धा अंमलबजावणी होत नसल्याने महासंघाला आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे म्हणाले.
बैठकीला उपाध्यक्ष विश्वनाथ मघाडे, बंडूभाऊ धोटे, राजेंद्र मसराम, कोषाध्यक्ष शहावत हुसेन, विभागीय सचिव लक्ष्मण राठोड, काळुराम धनगर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने