Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

चंद्रपूरातील दिक्षाभुमीच्या विकासासाठी एकत्रित 100 कोटी रुपयांचा निधी द्या, आदिवासी समाजासाठी आदिवासी भवन उभारा:- आ. किशोर जोरगेवार #chandrapur

अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी
चंद्रपूर:- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलांनी पवित्र झालेल्या चंद्रपूर येथील दिक्षाभुमीच्या विकासासाठी एकत्रित 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा सोबतच संविधान भवन आणि आदिवासी समाजासाठी आदिवासी भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 आक्टोंबर 1956 ला नागपूर येथे दिक्षा दिली. त्यानंतर 16आक्टोंबर 1956 ला चंद्रपूर येथील दिक्षाभुमीवर त्यांनी धम्माची दिक्षा दिली. जगामध्ये केवळ या दोनच ठिकाणी धम्म दिक्षा देण्यात आली आहे. असे असतांनाही चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचा अपेक्षीत असा विकास झालेला नाही. त्यामूळे नागपूर येथील दिक्षाभुमीच्या धर्तीवर चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचाही विकास करण्यात यावा या करीता एकत्रित 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना केली. याबाबत माझा सातत्याने पाठपूरा सुरु असल्याचेही ते यावेळी म्हणाले. संविधान निर्माते महामहिम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चंद्रपूरात भव्य संविधान भवन निर्माण करण्यात यावे अशी मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
चंद्रपूर हा आदिवासींचा जिल्हा आहे. चंद्रपूरचे राजे आदिवासी होते. गोंडकालीन असा हा जिल्हा आहे. असे असतांनाही आदिवासींसाठीचे एकही मोठे भवन येथे नाही. त्यामूळे आदिवासी भवनाची निर्मिती चंद्रपूरात करण्यात यावी अशी मागणी यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहे. मात्र आदिवासी जात पडताळणी केंद्र हे गडचिरोली जिल्ह्यात आहे.
आदिवासी मंत्री यांनी आदिवासी जात पडताळणी केंद्र चंद्रपूरात सुरु करण्याची घोषणाही केली होती. मात्र ते अद्याप सुरु झाले नाही. परिणामी येथील विद्यार्थ्यांना गडचिरोली जिल्ह्यात जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता आदिवासी जात पडताळणी केंद्र तात्काळ चंद्रपूरात सुरु करण्यात यावे अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
630 कोटी रुपयातून चंद्रपूर येथे मेडीकल कॉलेज साकारले जात आहे. मात्र 2020 पर्यंत हे शासकीय वैद्यकीय महाविद्याल सुरु होणे अपेक्षित होते मात्र ते अद्यापही सुरु झालेले नाही. त्यामुळे कॉलेजचे काम जलद गतीने पूर्ण करुन सदर कॉलेज सुरु करण्यात यावे, येथील कंत्राटी कामगारांचाही प्रश्न आहे. येथे 501 पदे भरण्याचे ठरविल्या गेले होते. सुरवातीच्या काळात हे पदे भरण्यात आली, मात्र नंतर 2021 - 22 या वर्षा करिता 207 पदे भरण्याची माण्यता देण्यात आली. त्यामूळे कोरोणाकाळात सेवा देणा-या या कर्मचा-र्यांच्या पदभरतीत कपात न करता आपण येथे 501 कर्मचा-र्यांची पदे भरावी अशी मागणीही यावेळी त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना केली. सर्व सुविधायुक्त “इंद्रायणी मेडिसिटी” सिटी पूण्याला तयार होत आहे. अशीच मेडिसिटी नागपूर येथेही सुरु करण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
  अन्न व औषध या विभागाशी नागरिकांचा अधिक संबंध येतो त्यामूळे हा विभाग नेहमी उत्तम असला पाहिजे. मात्र कोणतीही व्यवस्था या विभागाकडे नाही. येथे कर्मचारी नाही. सुगंधित तंबाखूवर या विभागाने बंधन घालावे. कोरोना काळात या विभागाचे महत्व समजले रेमडीसिविर इंजेक्शन वितरीत करण्याची जबाबदारी या विभागाकडे होती. मात्र विभागाकडे वाहण उपलब्ध नसल्याने दोन - दोन दिवस हे इंजेक्शन नागपूर येथे पडून राहायचे. कित्येकदा आम्ही वाहन पाठवून हे इंजेक्शन चंद्रपूरात आणले. त्यामूळे या विभागाकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागासवर्गीय समाजासाठी 36 ठिकाणी वसतीगृह बांधण्याची घोषणा केली आहे. यातील पहिले वसतीगृह चंद्रपूरात बांधावे अशी विनंतीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. विजय वडेट्टीवार यांना केली.
    महाराष्ट्र स्थापनेचे मंगल कलश आणणारे यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या घरकुल योजनेला 500 करोड रुपयांचा निधी द्या.

   महाराष्ट्र स्थापनेचा मंगलकलश आणणारे रे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने आपण यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना राबवत आहात मात्र या योजनेसाठी केवळ 50 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे योग्य नाही. त्यांच्या नावाला साजेल असा निधी या योजनेसाठी आपण दिला पाहिजे. त्यांच्या नावाने सुरु केलेल्या या योजनेसाठी किमान 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत